त्या आठ वर्षीय वाघिणीचा मृत्यू नैसर्गिकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 05:00 AM2021-02-14T05:00:00+5:302021-02-14T05:00:42+5:30
मृत वाघिणीचे तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असून शवविच्छेदनाचा अहवाल वनविभागाला प्राप्त झाला आहे. त्यात मृत वाघिण आठ वर्षांची असून तिचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे नमूद असल्याचे सांगण्यात आले. पांझरा गाेंडी (जंगल) परिसरात वाघिण मृतावस्थत पडून असल्याची माहिती मिळताच वनविभागाचे ठाकूर, आर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव, बीट रक्षक डेहनकर, वन्यजीव प्रेमी कौशल मिश्रा, संजय इंगळे तिगावकर यांनी घटनास्थळ गाठून वाघिणीचा मृतदेह ताब्यात घेत घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आर्वी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या ब्राह्मणवाडा बीटाचा एक भाग असलेल्या तुल्हाणा भागातील पांझरा (गोंडी) जंगल परिसरात एका वाघिणीचा मृतदेह आढळला होता. या मृत वाघिणीचे तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असून शवविच्छेदनाचा अहवाल वनविभागाला प्राप्त झाला आहे. त्यात मृत वाघिण आठ वर्षांची असून तिचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे नमूद असल्याचे सांगण्यात आले.
पांझरा गाेंडी (जंगल) परिसरात वाघिण मृतावस्थत पडून असल्याची माहिती मिळताच वनविभागाचे ठाकूर, आर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव, बीट रक्षक डेहनकर, वन्यजीव प्रेमी कौशल मिश्रा, संजय इंगळे तिगावकर यांनी घटनास्थळ गाठून वाघिणीचा मृतदेह ताब्यात घेत घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंधारे, डॉ. पाटील यांना पाचारण करण्यात आले. तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने मृत वाघिणीचे शवविच्छेदन केले होते. मृत वाघिण ही ४ ते ५ वयोगटातील असून क्षयरोगामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात होता.
तर शवविच्छेदन अहवालानंतरच वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे येणार होते. या मृत वाघिणीचा शवविच्छेदन अहवाल वनविभागाला प्राप्त झाला असून त्यात या वाघिणीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे नमुद करण्यात आले आहे.
मृतदेह होता बऱ्यापैकी कुजलेला
मृत वाघिणीचे शवविच्छेदन करून तिच्या मृतदेहाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढून या वाघिणीची शिकार झाली काय किंवा विषबाधेचा प्रकार तर नाही ना याबाबतची संपूर्ण शहानिशा केली होती. वाघिणीचा मृतदेह बऱ्यापैकी कुजलेला होता, त्यामुळे ही वाघिण नेमकी कोण हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. असे असले तरी वाघिणीची ओळख पटविण्यासाठी वनविभागाच्यावतीने विशेष प्रयत्न केले जात आहे.
तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत वाघिणीचे शवविच्छेदन केले होते. त्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. त्यात वाघिणीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे नमुद आहे. असे असले तरी ही वाघिण नेमकी कुठली याबाबत माहिती घेतली जात आहे.
- तुषार ढमढेरे,प्रभारी उपवनसंरक्षक, वर्धा.