‘त्या’ जखमी युवकाचा अखेर मृत्यू
By admin | Published: August 21, 2016 01:10 AM2016-08-21T01:10:34+5:302016-08-21T01:10:34+5:30
शेतातील पावसाचे पाणी निघण्याच्या वादातून चुलत भावाने कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या
मांडगाव येथील घटना : २५ दिवस जीवनाच्या झुंजीत मृत्यू वरचढ
समुद्रपूर : शेतातील पावसाचे पाणी निघण्याच्या वादातून चुलत भावाने कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या गणेश केशव बाभुळकर (२५) याचा उपचारादरम्यान २५ दिवसांनी मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील मांडगाव येथे उघड झाली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी प्रारंभी कलम ३०७, ३४ नुसार गुन्ह्याची नोंद करून योगेश वसंता बाभूळकर (२२), प्रफुल्ल वसंता बाभूळकर (२१) अनिल वसंता बाभूळकर (१९), तिघेही रा. मांडगाव यांना अटक करून न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली होती. आता नव्याने हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास ठाणेदार साळवी करीत आहे.
प्राप्त माहितीनुसार, गणेश केशव बाभुळकर व योगेश वसंता बाभूळकर या दोघांचे शेत लागूनच आहे. १५ वर्षांपूर्वी दोन्ही कुटुंबाच्या नातेवाईकांनी शेतीच्या वाटण्या करून दिल्या होत्या. त्यामध्ये दोघांनाही सेवाग्राम मार्गाला लागूनच शेत आले होते. मात्र योगेश बाभुळकर याला रस्त्याकडील पूर्णच शेत पाहिजे असल्याने धुसपूस होती. त्यातच पावसाचे पाणी गणेश शेतातून जात असल्याने गणेश व योगेश यांच्यात २३ जुलै २०१६ रोजी वाद झाला. यावेळी योगेश, प्रफुल्ल व अनिल या तिघांनी गणेशला बेदम मारहाण केली. यात कुऱ्हाडीने हल्ला केल्याने गणेश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ सावंगी मेघे रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा गुरूवारी मृत्यू झाला. यावरून हिंगणघाट पोलिसांनी पूर्वी दाखल केलेल्या भादंविची कलम ३०७ रद्द करून कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद केला आहे. तपास ठाणेदार साळवी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक विजय नाईक, जमादार सुनील पाऊलझाडे, गजानन काळे, रामदास चकोले, राजेश सहारे, ज्ञानेश्वर हाडके करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)