कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:54 PM2019-06-17T22:54:50+5:302019-06-17T22:55:05+5:30
येथील पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या मुन्ना उर्फ अनिल हिरालाल पांडे (५१) यांचा सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कर्तव्यावर असताना छातीत दुखत असल्याने पोलीस शिपाई अनिल पांडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : येथील पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या मुन्ना उर्फ अनिल हिरालाल पांडे (५१) यांचा सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कर्तव्यावर असताना छातीत दुखत असल्याने पोलीस शिपाई अनिल पांडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
पोलीस कर्मचारी अनिल पांडे हे मागील सुमारे तीन वर्षांपासून पोलीस स्टेशन सिंदी येथे पोलीस शिपाई या पदावर कार्यरत होते. सोमवार १७ जूनला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ते स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते. आरोपीची वैद्यकीय अधिकारी वंजारी यांच्याकडून तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान त्यांनी आपला बीपी तपासून घेतला. त्यांचा रक्तदाब थोडा जास्त असल्याने डॉक्टरांनी पांडे यांना औषध दिली. त्यानंतर पांडे हे आरोपीला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. दरम्यान पांडे यांची रवानगी सेलू येथील न्यायालयात आरोपी घेऊन जाण्याची करण्यात आली. त्यामुळे त्यांनी सोबत आणलेली शिदोरी पोलीस ठाण्यातच संपविली. सूर्य डोक्यावर चढत असताना ११.३० वाजताच्या सुमारास पांडे यांना छातीत दुखने सुरू झाले. शिवाय श्वास घेण्यास त्रास होत होता. सदर बाब लक्षात येताच त्यांना पोलीस ठाण्यातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले; पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.