अंकिताला जाळणारा नराधम विकेश दोषी; फाशी की जन्मठेप?, आज फैसला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 06:33 AM2022-02-10T06:33:56+5:302022-02-10T06:35:13+5:30
या घटनेलाही गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाली, आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी स्पष्ट केले.
हिंगणघाट (वर्धा) : प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे हिला भरचौकात पेट्रोल टाकून जाळून मारणारा नराधम विकेश उर्फ विक्की नगराळे याचा गुन्हा सिद्ध झाला. त्याला फाशी की जन्मठेप याचा निकाल सत्र न्यायालय गुरुवारी जाहीर करेल. थरकाप उडविणाऱ्या या जळीतप्रकरणात मृत्यूशी झुंज देणाऱ्या अंकिताचा १० फेब्रुवारी २०२० रोजी नागपूर येथील रुग्णालयात अंत झाला होता.
या घटनेलाही गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाली, आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना केंद्रस्थानी ठेवून आरोपीच्या शिक्षेबाबत दोन्ही बाजूंची मते जाणून घेतल्यावर गुरुवारी या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे विशेष शासकीय अभियोक्ता ॲड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयीन कामकाज संपल्यावर सांगितले. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
फाशी झाल्यावरच पूर्ण समाधान -
- न्यायालयाने आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले आहे. गुन्हा सिद्ध होणे हे आमच्या कुटुंबीयांसाठी तात्पुरते समाधान आहे. ज्यावेळी त्याला फाशीची शिक्षा होईल, तेव्हाच आमचे पूर्ण समाधान होईल.
- आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली तरच समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसून वचक निर्माण होईल, असे पीडितेचे वडील म्हणाले.
दाेन वर्षांची प्रतीक्षा -
- या बहुचर्चित जळीत प्रकरणाला ३ फेब्रुवारी रोजी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर बुधवारी आरोपी विकी नगराळे याला पोलीस बंदोबस्तात हिंगणघाट येथील न्यायालयात आणण्यात आले होते.
- न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले असले तरी त्याला फाशी दिली जाते की जन्मठेप, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता कायम आहे.
आरोपी दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. सरकारतर्फे आपण न्यायालयाकडे विनंती केली की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हत्येच्या आरोपात आरोपीला दोषी ठरविण्यात येते. त्यावेळी शिक्षेबाबत एक दिवसाची मुदत देण्यात येते. आरोपीला काय शिक्षा द्यावी, याचा एक तक्ता आपण न्यायालयात सादर करणार आहोत. त्या दृष्टिकोनातून न्यायालय शिक्षा जाहीर करेल.
- ॲड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील
आरोपीला या प्रकरणात दोषी ठरविणे ही आमच्यासाठी अन्यायकारक आणि दुःखद बाब आहे. या प्रकरणात २९ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. शिवाय आपण न्यायालयात ५६ पानांचे रीटन नोट्स ऑफ ऑर्ग्युमेंट दिले. असे असले तरी विकेशला दोषी ठरविण्यात आले आहे. गुरुवारी शिक्षा किती ते (क्वॉन्टम) ठरविले जाईल. आपण या न्यायालयात युक्तिवाद करणार नसून उच्च न्यायालयात दाद मागू.
- ॲड. भूपेंद्र सोने, आरोपीचे वकील