पाण्यात वाहून गेल्याने दोन वर्षाच्या युवराजचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:45 PM2018-01-15T22:45:47+5:302018-01-15T22:46:28+5:30
गरिबाचा वाली कोणीच नाही याचा प्रत्यय युवराजच्या मृत्यूने आणून दिला. अत्यंत गरीब कुटुंबातील दोन वर्षाचा युवराज खेळता-खेळता कालव्याच्या पाण्यात पडला.
आॅनलाईन लोकमत
आष्टी (शहीद) : गरिबाचा वाली कोणीच नाही याचा प्रत्यय युवराजच्या मृत्यूने आणून दिला. अत्यंत गरीब कुटुंबातील दोन वर्षाचा युवराज खेळता-खेळता कालव्याच्या पाण्यात पडला. तो परतलाच नाही. याची माहिती तळेगाव पोलिसांना देवूनही साधी तक्रार दाखल केली नाही. यामुळे शेवटी गावकºयांनीच शोधमोहीम राबवून युवराजचा मृतदेह शोधून काढला. काल त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
युवराज चव्हाण (२) रा. शिरकुटणी हा आई शेतात कामाला गेल्यावर घरासमोर खेळत होता. त्याचे वडील मुके, आंधळे व बहिरे असल्याने युवराज सरळ कालव्याजवळ गेला. याचा अंदाज त्यांना आला नाही. सध्या कालव्याद्वारे सिंचनाचे पाणी सोडल्याने कालवे तुडूंब भरून आहे. येथे खेळता-खेळता त्याने पाण्यात डोकावून पाहिले. तोल जाताच पाण्याच पडला व सरळ कालव्याने वाहन गेला. गावातील काही नागरिकांनी याप्रकरणी त्याच्या कुटुंबाला माहिती दिली. गावातील राजेंद्र पवार आणि सुरेश चव्हाण यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जमादाराने तक्रार दाखल न करता मी पाहतो म्हणत वेळ मारून नेली. रात्र झाली तरी बेपत्ता युवराजचा शोध लागला नाही.
शेवटी गावकरी व नातलग कालव्याच्या दिशेने रात्रभर शोधात निघाले. रविवारी सकाळी आर्वी तालुक्यातील मांडला कालव्याच्या गेटजवळ युवराजचा मृतदेह आढळला. पाण्यात गटांगळ्या खात गेल्याने शरीरावर खूप जखमा झाल्या होत्या. यानंतरही पोलिसांना माहिती दिली. तरीपण कुणीही पंचनाम्याकरिता आले नाही. शेवटी शवविच्छेदन न करताच अंत्यंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे शिरकुटणी गावात पोलिसांप्रती असंतोष पसरला आहे. मृत युवराजच्या आईने पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे.
युवराजच्या मृत्यूची चौकशी सुरू केली आहे. वास्तविक पाहता ठाण्यात तक्रार आली नाही. स्टेशन डायरी अंमलदार ठाण्यात कोणीच तक्रार द्यायला आले नाही, असे सांगत आहे. सत्यता शोधून कारवाईचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल.
- धर्मराज पटेल, पोलीस उपनिरीक्षक, तळेगाव