साहित्य संमेलनाच्या फंड वसुलीची चर्चा जोरात; विद्रोहींकडे निधीचा दुष्काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 12:42 PM2023-01-31T12:42:11+5:302023-01-31T12:43:07+5:30

संमेलनाच्या निधी वसुलीची जिल्हाभरात जोरदार चर्चा

Debate on Fund Recovery of Sahitya Sammelan in Loud; Rebels face drought of funds | साहित्य संमेलनाच्या फंड वसुलीची चर्चा जोरात; विद्रोहींकडे निधीचा दुष्काळ

साहित्य संमेलनाच्या फंड वसुलीची चर्चा जोरात; विद्रोहींकडे निधीचा दुष्काळ

Next

वर्धा : ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४, ५ फेब्रुवारी रोजी वर्ध्यात होऊ घातले आहे. या संमेलनाच्या निधी उभारणीसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे. समाजाच्या विविध घटकांतील सदस्यांकडून किमान २१०० रुपये निधी घेण्याबाबत आग्रही भूमिका समिती सदस्यांनी घेतली असल्याने सध्या संमेलनाच्या निधी वसुलीची चर्चा जिल्हाभरात जोरात आहे.

दुसरीकडे वर्ध्यातच ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विद्राेही साहित्य संमेलनाकडे निधीसह विविध सोयींचाही कमालीचा दुष्काळ दिसून येत आहे. वर्धेतील सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते दोन्ही साहित्य संमेलनांच्या आयोजकांशी जुळलेले असल्याने त्यांचीही आता मोठी गोची झाली आहे. कुणाकडे जावे, हा प्रश्न त्यांच्यासमोरही पडला आहे. राज्य शासनाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ५० लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. याशिवाय संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले माजी खा. दत्ता मेघे यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर निधी उभारणीत सहकार्य करण्यात आले आहे.

मेघे परिवाराच्या दातृत्वामुळे संमेलनाच्या कामालाही आतापर्यंत गती आली. राज्य सरकार आणखी निधी देण्याची शक्यता असून जिल्ह्यातील पाच आमदारांनी प्रत्येकी १० लाख रुपये निधीबाबत प्रशासनाला पत्रही दिले आहे. एवढा सर्व निधी असताना संमेलनाच्या ४२ आयोजन समित्यांच्या सदस्यांकडे पावती बुक देण्यात आले आहे. त्या माध्यमातूनही किमान २१०० रुपयांची पावती फाडण्याबाबत सूचना केल्या जात आहेत.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या तसेच खासगी शाळांच्या शिक्षकांकडूनही किमान ५०० रुपये गोळा करण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. काही कंपन्यांनीही सामाजिक दायित्व निधीतून संमेलनाला आर्थिक मदत दिली आहे. या सर्व रकमेची गोळाबेरीज केल्यास संमेलनाच्या आयोजनातून मोठा आर्थिक निधी उभा होणार असे सध्या चित्र आहे. या वसुलीची जोरदार चर्चा साहित्य वर्तुळासह वर्धेकरांमध्ये आहे. ज्यांचा साहित्याशी संबंधही नाही, अशांकडूनही साहित्य संमेलनासाठी देणगी घेतली जात आहे.

विद्रोही संमेलनाकडे साऱ्यांचीच पाठ

विद्रोही साहित्य संमेलन ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी रामनगर, सर्कस ग्राऊंडवर होऊ घातले आहे. यासाठी राज्यभरातून तसेच राज्याबाहेरून प्रतिनिधी येणार असले तरी त्यांच्या निवासासाठी जागेची टंचाई निर्माण झाली आहे. या संमेलनाला शासनाकडून कुठल्याही प्रकारचा निधी देण्यात आलेला नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची वसुली जोरात असल्याने पुन्हा या संमेलनाला मदत कोण देणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी अनेकांनी आयोजकांशी असलेले संबंध म्हणून फूल नाही तर फुलाची पाकळी अशी भूमिका स्वीकारत मदतीचा हात दिला, अशी माहिती आयोजकांपैकी काहींनी दिली.

Web Title: Debate on Fund Recovery of Sahitya Sammelan in Loud; Rebels face drought of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.