मृताची ओळख पटली अन् आरोपीही गवसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 09:54 PM2019-06-28T21:54:55+5:302019-06-28T21:55:21+5:30
मोर्शी मार्गावरील अप्पर वर्धा धरणालगतच्या जोलवाडी शिवारातील हत्याकांडाच्या तपासावर अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या चार दिवसाच्या अथक परिश्रमाने पडदा पडला. पोलिसांनी मृताची ओळख पटविण्यासोबतच आरोपीलाही अटक केली. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (श.) : मोर्शी मार्गावरील अप्पर वर्धा धरणालगतच्या जोलवाडी शिवारातील हत्याकांडाच्या तपासावर अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या चार दिवसाच्या अथक परिश्रमाने पडदा पडला. पोलिसांनी मृताची ओळख पटविण्यासोबतच आरोपीलाही अटक केली. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आले आहे.
आरोपी आणि मृत दोघेही अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील आहे. बेबी रमेश घोरपडे (४१) रा. चितरगव्हाण असे मृताचे तर वैभव देशमुख (३४) रा. गोरेगाव, असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत बेबी ही विवाहित असून तिला दोन मुली व एक मुलगा आहे. काही दिवसापूर्वी पतीचे निधन झाल्याने ती आपल्या मुलाबाळासोबत राहत होती. या दरम्यान वैभवशी तिचे सूत जुळले. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. जुलै महिन्यात वैभवचा विवाह असल्याने बेबीचा त्रास चांगलाच वाढला होता. त्यामुळे तिचा काटा काढण्याच्या उद्देशाने एमएच २७ एआर ०९८८ क्रमांकाच्या कारमध्ये बसवून तिला जोलवाडी परिसरात आणले. तेथे दोघांनी मद्यप्राशन करुन शरीर सुख घेतले. त्यानंतर चाकूने वार करुन तिला जागीच ठार केले. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात नेऊन पेट्रोल टाकून जाळल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व गुन्हे शाखेचे निरिक्षक पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक महेंद्र इंगळे, सहायक उपनिरिक्षक नामेदव किटे, नरेंद्र डहाके, हरिदास काकड, वैभव कट्टोजवार, अमित शुक्ला, नितीन मिटकरी, आत्माराम भोयर, मुकेश येल्ले यांनी केली.
पोलीस चार दिवस तळ ठोकून
आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतांना तेथील पोलिसांना तपासाची गतीच मिळाली नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले होते. हाती कोणताही ठोस पुरावा नसतानाही या पथकाने अमरावती जिल्ह्यात चार दिवस ठाण माडून प्रत्येक पोलीस ठाण्यातील तक्रारींची नोंद घेत पुरावा शोधून काढला. वरुड पोलीस ठाण्यात बेबी घोरपडे मिसिंग असल्याची नोंद होती. पोलिसांनी त्याच आधारे तपास केला असता तीचे आरोपी वैभव सोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वैभवला गोरेगाव येथून ताब्यात घेत विचारपूस केली असता. त्यांने गुन्ह्याची कबुली दिली.