व्यवसायाचे विकेंद्रीकरण हाच सर्वोदयचा मूलमंत्र होय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:32 PM2018-03-04T23:32:12+5:302018-03-04T23:32:12+5:30
महात्मा गांधी यांच्या विकास नितीला व खेड्यांकडे चला या भूमिकेला पंडीत नेहरूपासून सर्वांनीच हरताळ फासल्यामुळे फक्त एक टक्का व्यावसायिक घराण्याकडे सत्ता संपत्ती, अधिकार जमा आहे.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : महात्मा गांधी यांच्या विकास नितीला व खेड्यांकडे चला या भूमिकेला पंडीत नेहरूपासून सर्वांनीच हरताळ फासल्यामुळे फक्त एक टक्का व्यावसायिक घराण्याकडे सत्ता संपत्ती, अधिकार जमा आहे. सर्वांना समान वाटा यानुसार व्यवसायाचे केंद्रीकरण नाहीतर विकेंद्रीकरण हाच महात्मा गांधी यांच्या सर्वोदयाचा मुलमंत्री होय, असे प्रतिपादन अखिल भारतीय सर्वोदय समाजाचे राष्ट्रीय संयोजक आदित्य पटनायक यांनी केले.
स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिरात महाराष्ट्र अंनिस, राष्ट्रसेवा दल व अनेकान्त स्वाध्याय मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सर्व पुरोगामी, परिवर्तनवादी संस्था, संघटना समन्वय समिती यांच्या सहकार्याने ४५ व्या अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ‘महात्मा गांधी व विकासाची दिशा’ या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर खादी व ग्रामीण व्यवसाय संस्थेचे लक्ष्मीभाई, सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गुजर, महाराष्ट्र अंनिसचे राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, राष्ट्र सेवा दलाचे सचिव अविनाश सोमनाथे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पटनायक पुढे म्हणाले, महात्मा गांधीच्या नावावर अनेक आक्षेप आहे. विशेषत: सेवाग्राम आश्रमामुळे वर्धा जिल्ह्याचा विकास थांबला, असे बोलल्या जाते. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या विषयी क्लेषाची भावना तरूणांमध्ये निर्माण झाली. याला राजकारणी, राजकीय पक्ष, संघटना कारणीभूत आहे. महात्मा गांधी छोट्या-छोट्या उद्योग उभारणीच्या बाजूने होते. खेड्यातील उत्पादनावर कच्चा मालावर प्रक्रिया उद्योग गावातच उभे राहिल्यास ग्रामीण भागात रोजगार वाढून आर्थिक संपन्नता गावात येईल, सर्वांना काम मिळेल;पण ही दृष्टी स्वातंत्र्यनंतर अमलात आली नाही. आज मोठमोठ्या मशीनमुळे हातचा रोजगार गेला. संपत्तीचे केंद्रीकरण होवून मुठभर लोक श्रीमंत झाले. तर गरीब अधीक गरीब होवून तरूणांच्या हाताचे उद्योग जावून तरूण मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले. हे १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला परवडणारे नाही. आजही गांधीच्या सर्वोदय विचारांची गरज असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. खेड्यांमध्ये उद्योग उभारणे, गावातच रोजगार उपलब्ध करून दिले तरच शेतकरी आत्महत्या थांबून बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकतो, असेही यावेळी त्यांनी सांगितले. प्रास्ताविक सुनील सावध यांनी केले तर उपस्थितांचे आभार सारिका डेहनकर यांनी मानले.
गांधी विषयीच्या क्लेषाला संकुचित विचार जबाबदार
महात्मा गांधीच्या नावावर अनेक आक्षेप आहे. महात्मा गांधी यांच्यामुळे भारतात औद्योगिक प्रगती होवू शकली नाही. तर सेवाग्राम आश्रमामुळे वर्धा जिल्ह्याचा विकास थांबला, असे बोलल्या जात असून यामुळे महात्मा गांधी यांच्याविषयी क्लेषाची भावना तरूणांत निर्माण झाली. याला राजकारणी व राजकीय पक्ष जबाबदार कसे आहे हेही पटनायक यांनी स्पष्ट केले.