गणित, भौतिकशास्त्राला वगळण्याचा निर्णय चुकीचाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 05:00 AM2021-03-17T05:00:00+5:302021-03-17T05:00:51+5:30
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या नव्या निर्णयाचे स्वागत काही घटकातून करण्यात येत असले तरीही काही घटकातून यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आता अभियंता म्हणून करिअर करायचे असेल तर बारावीला (पीसीएम) गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय नसले तरी चालणार आहे अशा प्रकारचे नवे धोरण ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोरचा मोठा अडथळा आता दूर झाला असून मोठा दिलासा मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : समाजात तसेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात इंजिनियर, डॉक्टर यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही दोन्ही पदे समाजात प्रतिष्ठेची समजली जातात. दहावी-बारावीच्या गुणांवर प्रवेश प्रक्रिया निश्चित केली जाते. दहावी झाल्यावर तंत्रनिकेतनकडे गेल्यावर थेट द्वितीय वर्षात अभियांत्रिकीला प्रवेश मिळतो. तर बारावी झाल्यावर अभियांत्रिकी शाखेकडे जायचे असल्यास रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित विषयात किती गुण आहे हे पाहिले जाते. गुण कमी असल्यास अभियांत्रिकीसाठी जेईई, एमएससीआयटी परीक्षा देणे अनिवार्य होते.बारावीत गणित, भौतिकशास्त्र विषयात किती गुण आहे हे पाहूनच प्रवेश दिला जात होता. मात्र आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी भौतिकशास्त्र आणि गणित विषय बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि भौतिकशास्त्र हे गाभा समजले जातात मात्र २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी एआयसीटीई संस्थेने नियमांमध्ये बदल केले. आता संस्थेने १४ विषयांची यादी जाहीर केली असून यापैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के गुणासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या नव्या निर्णयाचे स्वागत काही घटकातून करण्यात येत असले तरीही काही घटकातून यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आता अभियंता म्हणून करिअर करायचे असेल तर बारावीला (पीसीएम) गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय नसले तरी चालणार आहे अशा प्रकारचे नवे धोरण ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोरचा मोठा अडथळा आता दूर झाला असून मोठा दिलासा मिळणार आहे.
या निर्णयाचा परिणाम...
अभियांत्रिकी प्रवेशासाठी भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय बंधनकारक होते. मात्र, आता हे विषय अनिवार्य नाही. अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या जागा पूर्णपणे भरल्या जात नाही. प्रवेश अटीमुळे अनेक प्रवेश रिक्त असतात ७० टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश नाही, मात्र, द्वितीय वर्षाच्या जागा तंत्रनिकेतन मधून सरळ भरल्या जातात.आता या बदलांमुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांनाही आता अभियांत्रिकीला प्रवेश मिळू शकतो. पहिले पीसीएममध्ये ३०० पैकी १५० गुण विद्यार्थ्यांना असेल तरच अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र ठरायचा. मात्र आता तसे राहणार नाही.
यावर्षी हा विषय बंद होऊ शकत नाही, कारण नीट, सीईटी परीक्षा असून हे विषय अनिवार्य आहे. एनएपी-२०२० या धोरणांतर्गत कोणत्याही विषयात प्रवेश घेता येऊ शकतो. गणित, भौतिकशास्त्र विषय बंद केलेला नाही. पूर्वी अभियांत्रिकी प्रवेशासाठी तो अनिवार्य होता. आता असेल तरी ठीक नसेल तरी ठीक. आता सर्वसाधारणपणे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो, त्याचे अभियंता होण्याचे स्वप्न तो साकार करू शकतो.
-प्रा. रवींद्र परणकर, आर. व्ही. परणकर अभियांत्रिकी महाविद्यालय आर्वी.
एआयसीटीइने आता गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय अनिवार्य केले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत फरक पडू शकतो. प्रवेश वाढू शकतो. मात्र, यासंदर्भात कोणतेच नोटिफिकेशन महाराष्ट्र शासनाकडून सध्या आले नाही. त्यामुळे थोडा संभ्रम निर्माण झाला आहे.
डॉ. प्रा. श्यामप्रकाश पांडे,
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
जिल्ह्यातील चार अभियांत्रिकी महाविद्यालये बंद
जिल्ह्यात आठ अभियांत्रिकी महाविद्यालय होते. मात्र, विद्यार्थी प्रवेश नसल्याने चार महाविद्यालये बंद झाली. तर आता बापूरावजी देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय, अग्निहोत्री महाविद्यालय, आर. व्ही परणकर अभियांत्रिकी महाविद्यालय आर्वी ही चार महाविद्यालये सुरू आहेत.
हे गैरसोयीचे होईल कारण अभियांत्रिकी शाखा अशी आहे की त्यात गणित आणि भौतिकशास्त्र या दोन्ही विषयाचे महत्व आहे. ते विषय कसे कमी केले, हाच प्रश्न आहे. हे दोन्ही विषय अभियांत्रिकीचा बेसिक भाग आहे. तो मुख्य विषय आहे. पीसीएममध्ये किती गुण मिळाले यावरून प्रवेश निश्चित होत होता. हे वगळण्यमागे नेमके कारण काय, त्याचा उद्देश काय, हे कळले नाही. पण यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरण्याची शक्यता टाळता येत नाही.
- राजेंद्र चौधरी, सदस्य,
बालभारती गणित अभ्यास मंडळ पुणे
अभियांत्रिकीला प्रवेश कमी आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असावा. की बाकी विषयही चालतील, मात्र प्रवेश झाले पाहिजे जागा खाली राहायला नको, असा उद्देश यामागचा असू शकतो, तसे तर फिजिक्स, केमिस्ट्री, गणित हेच अभियांत्रिकीत महत्वाचे विषय आहे. तो पाया आहे, मात्र यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीत संधी मिळू शकते
- योगेश घोगरे,
बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, सेवाग्राम.