उर्जामंत्र्यांच्या दरबारात ‘फैसला आॅन दी स्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:33 AM2017-08-19T01:33:10+5:302017-08-19T01:33:43+5:30
नागरिकांच्या समस्या, त्यावर अधिकाºयांचे उत्तर आणि मंत्र्यांचा शेरा सोबतच समस्या सोडविण्याकरिता लागणाºया कालावधीची विचारणा या प्रकारातून जनतेच्या समस्यांवर आॅन दी स्पॉट निर्णय घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागरिकांच्या समस्या, त्यावर अधिकाºयांचे उत्तर आणि मंत्र्यांचा शेरा सोबतच समस्या सोडविण्याकरिता लागणाºया कालावधीची विचारणा या प्रकारातून जनतेच्या समस्यांवर आॅन दी स्पॉट निर्णय घेण्यात आला. अधिकाºयांना समस्यांबाबत विचारणा करताना चांगलीच घाबरगुंडी उडाली. निमित्त होते महावितरणच्या जनता दरबाराचे. यावेळी जिल्ह्यातील एकूण २७१ तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचे निराकरण करून उर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी आॅन दी स्पॉट निपटारा केला.
बोरगाव (मेघे) येथील महावितरण कार्यालयाच्या आवारात आयोजित या तक्रार निवारण मेळाव्याला खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांची उपस्थिती होती. या दरबारात नागरिकांनी त्यांच्या समस्या महावितरणच्या अधिकाºयांच्या समक्ष मंत्र्याच्या उपस्थितीत बिनदिक्कत मांडल्या. तक्रार मेळाव्याला प्रारंभ होण्यापूर्वी ना. बावणकुळे यांच्या हस्ते कारला चौक परिसरातील काही कामांचा प्रारंभ करण्यात आला.
मेळावा प्रारंभ होताना आलेल्या तक्रारीतील सार्वजनिक तक्रारी मांडण्याचे आवाहन ना. बावणकुळे यांनी केले. पहिली समस्या पुलगाव येथील वीजेच्या खांबाची होती. यावेळी त्यांनी विभागाच्या अभियंत्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळाले नाही. यामुळे त्यांनी पुलगाव येथील अभियंता नाईक यांना चांगलेच धारेवर धरले. या तक्रारीपासून सुरू झालेल्या मेळाव्यात जिल्ह्यातील विविध भागातील समस्या नागरिकांनी मांडल्या. समस्याचे स्वरूप, ठिकाण आणि त्या भागाचा अभियंता समोरासमोर येताच नागरिकांच्या समस्या मार्गी लागल्याचे चित्र या मेळाव्यात निर्माण झाले होते. शेवटची तक्रार बोरगाव (मेघे) येथील ठरली. या गावातून गेलेली टावर लाईन बाहेरून काढण्याच्या सूचना त्यांनी केल्या. सोबतच सालोड (हिरापूर) आणि शेकापूर येथे सबस्टेशन देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या.
या व्यतिरिक्त देयकाच्या समस्या, आठ तासाचा वीज पुरवठा, वेळीअवेळी होणारे भारनियमन, रस्त्यात उभे असलेले पोल, लाईनमनची समस्या, शेतातील पडलेले पोल, लोंबकळलेल्या तारा, दुरूस्तीची बोंब यासह अनेक समस्या यावेळी नागरिकांनी मांडल्या. या समस्या सोडविण्याकडे लक्ष देण्याच्या सूचना ना. बावणकुळे यांनी अधिकाºयांना दिले.
या मेळाव्यात महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता रफीक शेख, वर्धेचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, नागपूर येथील अधीक्षक अभियंता यु.बि. शहारे, अधीक्षक अभियंता राकेश जनबंधू यांच्यासह नागपूर विभागासह वर्धा जिल्ह्यातील सर्वच अभियंते यावेळी उपस्थित होते तर नागरिकांचीही उपस्थिती होती.
कायम दारूबंदी मागू नका
वर्धा जिल्हा दारूबंदी असून येथे अवैध दारूची विक्री जोरात आहे. यावर प्रतिबंध लावण्याच्या सूचना उत्पादन शुल्क मंत्र्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांन दिल्या. यावेळी नागरिकांनी राज्यातच दारूबंदी करण्याची मागणी केली. वैध दारू बंद करणे अवघड असल्याचे सांगितले. यामुळे राज्यात दारूबंदीची मागणी करून नका, असे उत्तर नागरिकांना दिले.
सेल्फी काढून महावितरणच्या अॅपवर टाका
नागरिकांना सेवा देण्याकरिता महावितरणच्यावतीने अॅप देण्यात आले आहे. या अॅपचा वापर नागरिकांनी करावा. महिन्याच्या ३० तारखेला मिटरच्या रिडींगसह सेल्फी काढून तो अॅपवर टाका. यातून घोळा होणार नाही. नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता मोबाईल अॅप एक महत्त्वाचे साधन असून त्याचा वापर वाढविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावर येत्या ३० दिवसांत अंमल करण्याची माहिती त्यांनी यावेळी.
महिन्याच्या शेवटी ग्राहक मेळावे
नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता महिन्याच्या शेवटी ग्राहक मेळावे घ्यावे. शिवाय महिन्याच्या शेवट केलेल्या कामाची माहिती पालकमंत्री, खासदार, आमदारांना द्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत - चंद्रशेखर बावणकुळे
महावितरणच्यावतीने देण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधा आता जुन्या झाल्या आहेत. वीज वहन करणारे लोखंडी खांब गंजले आहेत. ही व्यवस्था दुरूस्त करण्याची गरज आहे. या व्यतिरिक्त काही नव्या योजना राबविण्यात येत आहे. याकरिता जिल्ह्याला ३६ कोटी रुपये मिळाले आहेत. त्या कामांना आज शुभारंभ करण्यात आला. या व्यतिरिक्त दुरूस्तीच्या कामाकरिता जिल्ह्याला साधारणत: ३०० कोटी रुपये लागण्याची शक्यता आहे. त्याचा सर्व्हे करण्यात येत आहे. येत्या दिवसात ही सुविधा लवकरच पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती ना. बावणकुळे यांनी दिली.
गावातूनच लाईनमनची निवड करा
वीज दुरूस्त करण्याची समस्या असून ती मार्गी काढण्याकरिता गावातूनच लाईनमनची निवड करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. याचे अधिकारी प्रारंभी ग्रामपंचायतीने सभेच्या माध्यमातून करावी. याकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्यास जिल्हा परिषदेच्यावतीने या लाईनमनची नियुक्ती करण्यात येईल.
ग्रा.पं.त अभियंत्यासह लाईनमनच्या मोबाईल क्रमांकाची पाटी लावा
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत त्या भागातील अभियंता आणि लाईलमनच्या नावासह त्याच्या क्रमांकाची पाटी लावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
आठ तास लाईन न मिळाल्यास तीन सीआर खराब
शेतकºयांना सिंचनाकरिता आठ तास लाईन देणे बंधनकारक आहे. यात ज्या भागात कुचराई होईल त्या भागातील अधिकाºयांचे तीन सीआर खराब करण्याची तंबी ना. बावणकुळे यांनी दिली.
याच वेळी गोजी येथे १५ दिवस पुरवठा खंडित असल्याचे प्रकरण मंत्र्यांसमोर आले असता त्यांनी या भागाचे अभियंता वालदुरे यांना विचारणा केली. त्यांच्या उत्तरावरून कामात हयगय झाल्याचे समोर आले. यावरून वालदुरे यांचे तीन वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले.
मी पाठीशी; शेतकºयांशी सलोख्याने वागा
महावितरणच्या कार्यालयात आलेल्या शेतकºयाची अडचण समजून घेत त्यांच्याशी सलोख्याने वागा. मी महावितरणच्या प्रत्येक अधिकारी कर्मचाºयाच्या पाठीशी आहे. अडचण आल्यास कोणत्याही क्षणी संपर्क साधा; पण शेतकºयांना त्रास दिल्यास सोडणार नाही, असेही ना. बावणकुळे यावेळी म्हणाले.
मुख्यालयाच्या मुद्यावरून अधीक्षक अभियंत्याला तासले
महावितरणच्या कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याचे आदेश आहेत. असे असताना अनेक कर्मचारी मुख्यालयाला दांडी मारत असल्याचे दिसून आले. यावर अधीक्षकांना विचारणा केली असता त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळाले नाही. यामुळे अधीक्षक अभियंजा देशपांडे यांना मंत्र्यांनी चांगलेच तासले.
पोहण्याच्या अभियंत्याचे कौतुक
पोहणा येथील अभियंता श्रूंगारे यांच्याकडून शेतकºयांना नेहमीच मदत होत असल्याचे एका शेतकºयाने सांगितले असता मंत्र्यांकडून त्यांची पाठ थोपटण्यात आली.