हिंगणघाट तालुक्याला जिल्हा घोषित करा, माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
By अभिनय खोपडे | Published: August 10, 2023 05:22 PM2023-08-10T17:22:01+5:302023-08-10T17:24:39+5:30
हिंगणघाट जिल्हा म्हणुन उभा राहण्यास सक्षम
वर्धा : जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याला जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत अशोक शिंदे लवकरच मुंबई येथे शिष्टमंडळासह जावून ही मागणी शासनाकडे रेटून धरणार आहेत.
अशोक शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुका हा लोकसंख्या, संसाधन, व्यापार आदी दृष्टीने जिल्हा होण्यासाठी सक्षम आहे. हिंगणघाट व समुद्रपुर तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याचे ठिकाण हे फार दुरचे त्रासाचे आहे. येथील बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजार समिती, कापड निर्मिती कारखाना, औद्योगिक प्रगती या सर्व बाबी हिंगणघाट जिल्हा म्हणुन उभा राहण्यास सक्षम आहे.
सध्या राज्यात कोणकोणते जिल्हे होऊ शकते किंवा शासन / प्रशासनाच्या दृष्टीने योग्य ठरणार याची चाचपणी सुरू आहे. हिंगणघाट वासीयांच्या वतीने येथील सर्व घटकांना सोबत घेवुन अभ्यासपुर्ण पध्दतीने आपणांस भेटून आपल्याला या बाबीचे गांभिर्य लक्षात आणुन देण्याचा प्रयत्न करणार आहोत असे अशोक शिंदे यांनी या पत्रात नमूद केले आहे.