दिवाळीत सराफा व्यवसायाला मंदीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:30 AM2017-10-23T00:30:38+5:302017-10-23T00:31:35+5:30
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या दिवाळीत अनेक जण आपापल्या परीने सोन्याची खरेदी करतात. परंतु, अनेक नागरिक यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर सराफा व्यावसायिकांच्या दुकानाकडे ......
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या दिवाळीत अनेक जण आपापल्या परीने सोन्याची खरेदी करतात. परंतु, अनेक नागरिक यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर सराफा व्यावसायिकांच्या दुकानाकडे फिरकलेच नाही तर अनेकांनी पाहिजे तशी खरेदी केली नाही. यंदा गत वर्षीच्या तूलनेत केवळ ३० टक्केच नागरिकांनी सोन्याची खरेदी केली, असे सराफा व्यावसायिक अनिल कठाणे यांनी सांगितले.
दिवाळीत अनेक जण आपआपल्या परीने नवीन वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. बरेच जण दिवाळीचा मुहूर्त साधून सोने खरेदी करतात. पण यावर्षी नोटाबंदी, जीएसटी आदींचा परिणाम सराफा व्यवसायावर दिसून आला. दिवाळीच्या कालावधीत मंदिमुळे सराफा व्यवसायात ३० ते ३५ टक्क्यांची घट आल्याचे सांगण्यात आले. सोबतच कापूस, सोयाबीन आदी शेतपिकांना योग्य भाव मिळत नसल्याने याचा परिणामही कपडा, सराफा आदी बाजारपेठेवर झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले. दिवाळी म्हटले की नवीन वस्तू व कपड्यांची खरेदीही आलीच. याच निमित्ताने अनेक जण सोने खरेदी करतात. त्यामध्ये सुवर्णालंकार, आभूषणे आदींचा समावेश असतो. कुणी वापरासाठी तर कुणी ठेव म्हणून सोन्याची खरेदी करतात. दिवाळीच्या कालावधीत दरवर्षी कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. व्यवसाय वुद्धींगत होत असल्याने या मुहूर्ताची सराफा व्यावसायिकांनाही प्रतीक्षा असते. यंदा कुठलाही परिणाम व्यवसायावर होणार नाही अशी व्यावसायिकांना अपेक्षा होती. ऐन दिवाळीच्या मुहूर्तालाच अनेकांनी सराफा व्यवसायिकांच्या प्रतिष्ठानांकडे पाठ फिरविली. परिणामी, नेहमी होणाºया कोट्यवधींच्या उलाढालीवर विपरित परिणाम दिसून आल्याने सराफा व्यवसायिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. यंदाच्या वर्षी केवळ ३० ते ३५ टक्केच व्यवसाय झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगितल्या जात आहे.
ठेव म्हणून सोन्याची खरेदी
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या दिवाळीत अनेक जण ठेव म्हणून सोन्याची खरेदी करतात. परंतु, यंदाच्या वर्षी पाहिजे तसे ग्राहकच स्थानिक सराफा बाजारात फिरकले नाही. त्यामुळे पाहिजे तशी उलाढाल स्थानिक सराफा बाजारपेठेत यंदा झाली नसल्याचे व्यापाºयांकडून सांगण्यात येते. दिवाळीनिमित्त अनेकजण वापरासाठी किंवा घरी असलेल्या लग्नसमारंभासाठी सोन्याची खरेदी करतात.