दीपकची आत्महत्या नसून हत्याच
By admin | Published: June 30, 2014 12:02 AM2014-06-30T00:02:31+5:302014-06-30T00:02:31+5:30
भारतीय सैन्य दलाचा शिपाई व नाचनगाव येथील वॉर्ड क्रमांक ४ गाडगेनगर येथील दीपक शंभरकर खंडारकर (३४) याचा १९ जून रोजी रेल्वे रूळावर मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक
वडिलांचा आरोप : जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
पुलगाव : भारतीय सैन्य दलाचा शिपाई व नाचनगाव येथील वॉर्ड क्रमांक ४ गाडगेनगर येथील दीपक शंभरकर खंडारकर (३४) याचा १९ जून रोजी रेल्वे रूळावर मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दीपकची आत्महत्या नसून तो घातपात असल्याचा संशय त्याच्या वडीलांनी व्यक्त केला. यामुळे त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्याचे वडिल शंकर खंडारकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनातून केली़
दीपक हा ७ महार रेजिमेंट आसाम(हाशीमारा) येथे सैन्यात नायक पदावर कार्यरत होता़ तो विवाहानिमित्त रजेवर आला होता़ १६ जून १४ रोजी त्याचा बेलोरा येथे विवाह झाला. १७ जूनला त्याच्या लग्नाचा स्वागतसमारोहाचा कार्यक्रम झाला. तो १८ जूनला सासरी बेलोरा येथे सत्यनारायण पूजेसाठी गेला होता़ हा कार्यक्रम आटोपून तो त्याच दिवशी पत्नीसोबत पुलगावला आला़
१९ जून रोजी सायंकाळी ४़३० वाजता बाहेर जावून येतो असे सांगून दीपक बाहेर गेला तो परत आलाच नाही़ मध्यरात्री पर्यंत परिवारातील लोकांनी त्याचा शोध घेतला; परंतु शोध न लागल्यामुळे त्याचे वडिल रात्री ३ वाजता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी गोड सल्ला देवून जबाबदारी टाळली़
२० जूनला रेल्वे लाईनवर त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळले़ दीपक घरून गेला तेव्हा त्यांच्या बोटात सोन्याची अंगठी मोबाईल व रोख राशी होती; परंतु त्याच्या मृतदेहाजवळ यापैकी काहीच आढळले नाही़ यामुळे ही आत्महत्या नसून माझ्या मुलाचा घातपाती मृत्यू असल्याचे निवेदनात नमूद करून त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी त्याच्या वडिलांनी केली आहे़(तालुका प्रतिनिधी)