शिक्षकांच्या दबावतंत्राचा ‘दीपाली’ ठरली बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:26 AM2019-02-16T00:26:30+5:302019-02-16T00:27:15+5:30
नजीकच्या पिपरी (मेघे) येथील अग्रगामी हायस्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेणाऱ्या दीपाली रवींद्र जानवे (१४) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. दीपाली हिच्यावर तिच्या शाळेतील शिक्षकांनी अभ्यासाबाबत अतिशय जास्त मानसिक दडपण आणले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नजीकच्या पिपरी (मेघे) येथील अग्रगामी हायस्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेणाऱ्या दीपाली रवींद्र जानवे (१४) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. दीपाली हिच्यावर तिच्या शाळेतील शिक्षकांनी अभ्यासाबाबत अतिशय जास्त मानसिक दडपण आणले होते. त्यांच्या याच दबावाला कंटाळून तिने आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेतला. दीपाली ही अग्रगामी हायस्कूलमधील हेकेखोरवृत्तीच्या शिक्षकांच्या दबावतंत्राचा बळी ठरल्याचा आरोप दीपालीची आई रश्मी जानवे यांनी केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक मुख्य मार्गालगत रहिवासी असलेली दीपाली जानवे हिचे प्राथमिक शिक्षण अग्रगामी शाळेतच झाले. त्यानंतर तिला पिपरी (मेघे) येथील अग्रगामी हायस्कूलमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. सध्या ती तेथे नववीचे शिक्षण घेत होती.
सदर घटनेच्या काही दिवसांपूर्वी अग्रगामी शाळेत पालक सभा घेण्यात आली. यावेळी जे विद्यार्थी शाळेच्यावतीने घेण्यात येणाºया परीक्षेत ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा जोसेफ यांच्या सूचनेवरून शाळेतील शिक्षकांनी ‘जर तुमच्या पाल्याने पुढील परीक्षेत ५० टक्क्यांच्यावर वर गुण घेतले नाही तर तुम्हाला तुमच्या पाल्याची टीसी देण्यात येईल’ अशा आशयाचा मजकूर पालकांकडून लेखी घेतला. यात मृतक दीपालीच्या पालकाचाही समावेश होता. त्यामुळे दीपाली ही काही दिवसांपासून अतिशय तणावात होती.
अशातच नववीचे शिक्षण घेण्याºया दीपाली हिने गुरूवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपालीच्या आत्महत्येस शिक्षकांचे दबावतंत्र जबाबदार असून या प्रकरणी योग्य कारवाई करण्याची मागणी मृत दीपालीच्या कुटुंबीयांनी केली आहे. सदर घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
अन्य उपक्रमात राहायची पुढे
शाळेच्यावतीने घेण्यात येणाºया सांस्कृतिक, खेळ स्पर्धा आदी उपक्रमात दीपाली ही स्वयंस्फूर्तीने भाग घेत होती. तिने आतापर्यंत कुठले असे मोठे पारितोषिक पटकाविले नसले तरी तिचा इतर उपक्रमातील सहभाग कौतुकास्पदच होता, असे सांगण्यात आले.
शाळेला दिली सुटी
दीपालीच्या आत्महत्येची वार्ता शाळेतील शिक्षकांना मिळताच शुक्रवारी शाळेला सुटी देण्यात आली होती.
शाळेत पार पडलेल्या शिक्षक-पालक सभेत कमी गुण घेणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लेखी मजकूर घेण्यात आला होता, हे जरी खरे असले तरी तो केवळ पालकांनी आपल्या पाल्याबाबत जागरूक व्हावा यासाठी होता. पूर्वीचा अभ्यासक्रम बदलला असून आता १०० गुणांसाठी विद्यार्थ्यांना लिहावे लागते. जे विद्यार्थी अभ्यासात कमजोर आहेत, त्यांच्यासाठी शाळेच्यावतीने अतिरिक्त विशेष वर्ग घेतले जातात. आम्ही चांगला विद्यार्थी घडावा यासाठी प्रयत्न करतो.
- दीपा जोसेफ, मुख्याध्यापिका, अग्रगामी हायस्कूल, पिपरी (मेघे).
दीपाली जानवे ही विद्यार्थिनी अभ्यासात कमजोर असली तरी ती शाळेच्यावतीने आयोजित करण्यात येणाºया इतर उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत होती. तिने आतापर्यंत कुठलेही बक्षीस पटकाविले नसले तरी तिचा इतर उपक्रमातील सहभाग कौतुकास्पद होता.
- डी. जी. मेहरे, वर्ग शिक्षक, अग्रगामी हायस्कूल, पिपरी (मेघे).