बोर नदीचे खोलीकरण व सरळीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:54 PM2017-10-01T23:54:50+5:302017-10-01T23:55:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू/घोराड : पावसाळ्याचे दिवस संपायला आले तरी तालुक्यातील विहिरींच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झालेली नाही. सेलू तालुक्यातील शेतकºयांना शाश्वत शेती करण्यासाठी व बागायती तालुक्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी बोर नदीच्या पात्राचे खोलीकरण व सरळीकरण करण्याची मागणी शेतकºयांची आहे.
तालुक्यात ६६ हजार ३४० हेक्टर मध्ये असलेले कृषी क्षेत्र असून पैकी ४ हजार ९२१ हेक्टर क्षेत्र बागायती आहे. या तालुक्यात १५ ते २० वर्षांपूर्वी २०० ते ३०० हेक्टरमध्ये असणाºया केळीच्या बागा सध्या केवळ २५ ते ३० हेक्टरमध्ये शिल्लक राहिल्या आहेत. ४० ते ४२ हजार हेक्टर कृषीे क्षेत्रात खरीप हंगामातील सोयाबीन व कापसाचे पीक विहिरीच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज घेत घेतले जात आहे. रबी हंगाम हा बोरधरणाच्या पाण्याच्या साठ्यावर अवलंबून असतो. ५० वर्षांपूर्वी बोर नदीवर धरण बांधण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या धरणाचे उद्घाटन केले. तेव्हापासून या धरणाला यशवंत धरण म्हणून ओळखले जाते. ५० वर्षांच्या कालखंडात उद्दिष्टपूर्ती झाली नसून तेव्हाच्या वितरिका व पाटचºया दुर्लक्षित आहेत. शेतांपर्यंत पाणी पोहोचविताना अर्ध्याधिक पाण्याचा अपव्यय होत आहे. सरकार शेतकºयांचे जीवनमान उंचविण्यासाठी सिंचन विहीर, फळबाग लागवड, ठिबक व तुषार सिंचन आदीसाठी अर्थसहाय्य करीत आहे; पण विहिरीच्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी या परिसरात असलेल्या बोर नदीच्या पात्राचे खोलीकरण व सरळीकरण करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. सदर कामे वेळेत झाल्यास शेतकºयांना सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकेल. शिवाय विहिरीच्या पाणीपातळीही वाढ होईल. यामुळे या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
बागायती तालुक्याला हवे गतवैभव
केळीची बाजारपेठ म्हणून विदर्भात सेलूची ओळख होती. घोराड, सेलू, वडगाव, रेहकी, सुरगाव येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेत होते. येथील केळी नागपुर, अमरावती, यवतमाळसह मध्यप्रदेशात दुर्ग, मय्यर, कटनी, बिलासपुर, रायपुर येथे विकल्या जात होती; पण १५ वर्षांत विहिरीच्या पाण्याच्या पातळीत आलेली घट व भारनियमन यामुळे केळीच्या बागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सेलू तालुक्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलण्याची मागणी आहे.
बंधारे बनले शोभेचे
बोर नदीवर असणारे बंधारे शोभेचे बनले आहे. बंधाºयाची डागडुजी व दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने बंधाºयात पाणी अडत नाही. अन् पाणी जमिनीतही जिरत नाही.