पशुवैद्यकीय दवाखान्याचे सदोष बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 11:30 PM2018-09-11T23:30:58+5:302018-09-11T23:31:34+5:30
नजिकच्या येळाकेळी येथे ५० लाख रुपये खर्चुन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग सेलूच्या नियंत्रणाखाली सुरु असलेले हे बांधकाम दर्जाहीन असल्याने या बांधकामाची चौकशी करावी,.....
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : नजिकच्या येळाकेळी येथे ५० लाख रुपये खर्चुन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग सेलूच्या नियंत्रणाखाली सुरु असलेले हे बांधकाम दर्जाहीन असल्याने या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी सरपंच रवीशंकर वैरागडे यांनी विभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.
येळाकेळी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. सात-साडेसात हजार लोकसंख्येच्या या गावात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. शिवाय ३ ते ५ कि़मी च्या परिसरात ४ ते ५ गावे आहे. मात्र पशुवैद्यकीय दवाखाना नसल्याने पशुधन पालकांना खासगी सेवा देणाºया डॉक्टरवर अवलंबुन रहावे लागत होते. त्यामुळे सरपंच वैरागडे यांनी पाठपुरावा करुन पशु वैद्यकीय दवाखान्याचा प्रश्न मार्गी लावला.५० लाख रुपयाचा निधी प्राप्त झाल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग सेलू अंतर्गत या इमारतीचे काम सुुर करण्यात आले. पण, सुरुवातीपासून कामाचा दर्जा निकृष्ठ असल्याची ओरड गावकऱ्यांकडून करण्यात आली. कनिष्ठ अभियंता व उपविभागीय अभियंता यांच्याकडे तक्रार केल्यावरही दुर्लक्ष करण्यात आले. येथील संरक्षण भिंती व इमारत बांधकामात तुटक्या व ठिसूळ विटाचा वापर केला. शिवाय सिमेंटचा नाममात्र वापर करुन माती मिश्रीत वाळू वापरण्यात आल्याने अल्पावधीतच संरक्षक भिंतीला तडे गेले. स्लॅबच्या बांधकामाचाही दर्जा असाच आहे. वारंवार तक्रारीकरुनही बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने अधिकारी व कंत्राटदारांचे साटेलोटे असल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे या कामाची गुणनियंत्रकांकडून चौकशी करण्याची मागणी सरपंच वैरागडे यांनी केली.