वनविभागाची परवानगी घेऊन वृक्षतोड; तरी वनरक्षकाने शेतकऱ्यावर नोंदविला वनगुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 05:00 AM2022-06-10T05:00:00+5:302022-06-10T05:00:24+5:30
हनुमंत वानखेडे असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांचे बोरखेडी शिवारात वडिलोपार्जित २.६ हेक्टर शेत आहे. पंधरा वर्षांपूर्वी या शेतातील सागाची वृक्ष तोडण्यात आली होती. त्याच ठिकाणी पुन्हा काही दिवसांपूर्वी सागाचे ५१ वृक्ष कापण्यात आले. याकरिता वानखेडे यांनी वनविभागाला रितसर परवानगी मागितली होती. शेतकऱ्याने परवानगी दाखविल्यानंतरही पैसे न मिळाल्याने वनरक्षक राऊत यांनी शेतकऱ्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करून माल जप्त केला. तोडलेला माल जप्त करुन तो आष्टीच्या कार्यालयात आणला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्ष्टी (शहीद) : तालुक्यातील बोरखेडी येथील शेतकऱ्याने वनविभागाची रितसर परवानगी घेऊन शेतातील ५१ सागाची झाडे तोडली. सर्व प्रक्रिया अधिकृतरित्या केली असतानाही दुसऱ्या बीटच्या वनरक्षकाने या शेतकऱ्याला चक्क दहा हजारांची मागणी करत वनगुन्हा दाखल करून सर्व माल जप्त केला. या धक्कादायक कारवाईमुळे वनपरिक्षेत्र अधिकारी, उपवनसंरक्षकही चकीत झाले असून त्यांनी वनरक्षकाला धारेवर धरत चौकशी सुरू केली आहे.
हनुमंत वानखेडे असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांचे बोरखेडी शिवारात वडिलोपार्जित २.६ हेक्टर शेत आहे. पंधरा वर्षांपूर्वी या शेतातील सागाची वृक्ष तोडण्यात आली होती. त्याच ठिकाणी पुन्हा काही दिवसांपूर्वी सागाचे ५१ वृक्ष कापण्यात आले. याकरिता वानखेडे यांनी वनविभागाला रितसर परवानगी मागितली होती. तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी हृषिकेश पाटील, क्षेत्र सहाय्यक सुधाकर देशमुख, वनरक्षक सारिका पिदुरकर यांनी घटनास्थळी पाहणी करून शेतकऱ्याला ५१ वृक्ष (खसरा) कापण्याकरिता १३ एप्रिल २०२२ ला मंजुरी दिली. त्यानुसार शेतकरी हनुमंत वानखडे यांनी सर्व सागवान वृक्षांची तोडणी केली. तोडलेला सांग शेतातच एका ठिकाणी ठेवून त्यावर वनविभागाने मार्किंग केले. असे असतानाही मुबारकपूर बीटचे वनरक्षक राऊत यांनी वानखेडे यांच्या शेतात जावून शेतकऱ्यावर प्रश्नांची सरबत्ती करुन दहा हजार द्या, अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली. तेव्हा शेतकऱ्याने परवानगी दाखविल्यानंतरही पैसे न मिळाल्याने वनरक्षक राऊत यांनी शेतकऱ्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करून माल जप्त केला. तोडलेला माल जप्त करुन तो आष्टीच्या कार्यालयात आणला. हा प्रकार पाहून वनपरिक्षेत्र अधिकारीही आश्चर्यचकीत झाले. शेतकऱ्याने हा सर्व प्रकार प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी गायनेर यांना सांगितला. गायनेर यांनी वनरक्षक राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी उडावाउडवीचे उत्तर दिले. शेतकऱ्याने याची लेखी तक्रार उपवनसंरक्षक यांच्याकडेही केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक उपवनसंरक्षक बि.एन. स्वामी यांनी आष्टी गाठून वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत वानखेडे यांचे शेत गाठून पाहणी केली. यावेळी सर्व माल शेतकऱ्याचा असल्याचे स्पष्ट झाल्याने भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी सर्व्हेअरच्या माध्यमातून शेताची मोजणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वनरक्षक राऊत यांना विचारणा केली असता ते निरुत्तर झाले. शेतकरी हनुमंत वानखडे हे बोरखेडीतील प्रतिष्ठित नागरिक असून ते संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे काही वर्षे अध्यक्ष होते. अशा व्यक्तीला पैशांची मागणी करून खोट्या गुन्ह्यांत अडकविणे आता वनरक्षकाच्या चांगलेच अंगलट येणार आहे. याप्रकरणी विभागीय चौकशी सुरू झाली असून नागपूर विभागाच्या फिरते पथक व विभागीय वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. आता याप्रकरणी वनरक्षकावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
वनरक्षकावर यापूर्वी लाचलुचपतची कारवाई
- आष्टीत कार्यरत असताना वनरक्षक राऊत यांनी काही वर्षांपूर्वी एका आरामशीन चालकाला लाचेची मागणी केली होती. त्यावेळी लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे निलंबन करून खरांगणा येथे देण्यात आले होते. मात्र, वनविभागाने राऊत यांची पुन्हा आष्टीला बदली केल्याने त्यांचा भ्रष्ट कारभार चांगलाच वाढला. त्यामुळे त्यांची मजोरवृत्ती वनविभागासाठीच तापदायक ठरली. अशा भ्रष्ट कर्मचाऱ्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी शेतकरी हनुमंत वानखेडे यांनी केली आहे.
याप्रकरणी वानखडे यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली. कापलेली सागवान वृक्ष ही शेतकऱ्याच्या मालकीची असल्याचे प्रथमदर्शनी निश्चित झाले. त्यांच्यावर झालेली कारवाई अतिशय चुकीचे आहे. यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहे. सोबतच सर्व्हेअरला बोलावून मोजमाप करण्याचे आदेश दिले आहे.
बी. एन. स्वामी, सहायक उपवनसंरक्षक वनविभाग वर्धा.