उपचाराकरिता दिरंगाई, सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 05:10 PM2023-05-27T17:10:48+5:302023-05-27T17:14:32+5:30
कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची मागणी
हिंगणघाट (वर्धा) : सर्पदंश झालेल्या महिलेवर तातडीने उपचार न करता काही वेळाने उपस्थित डॉक्टरांनी सेवाग्रामला पाठविले. परंतु, वाटेतच त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर कारवाई करून मृत सीमा मेश्राम यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची मागणी सर्पमित्र प्रवीण कडू यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पिंपळगाव (मा.) येथील किशोर मेश्राम यांच्या पत्नी सीमा मेश्राम या २३ मे रोजी घरकाम करत असताना त्यांना पायाला काहीतरी चावल्याचा भास झाला. त्याचवेळी पायाजवळून उंदीर गेला. चावा घेतलेल्या जागेवर खूप वेदना होत होती म्हणून त्यांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. येथील डॉक्टरांनी त्यांना औषध देऊन घरी परत पाठविले. त्या घरी परतल्यावर खूप अस्वस्थ वाटायला लागले आणि वेदनाही जास्त होऊन छातीत दाटल्यासारखे वाटायला लागले. म्हणून पुन्हा उपजिल्हा रुग्णालय गाठले. त्यांच्या पतीने डॉक्टरांना सर्व घटना सांगितली, पण डॉक्टरांनी लागलीच उपचार न करता काही वेळ थांबवून ठेवले. त्यानंतर सेवाग्रामच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेने त्यांना सेवाग्रामला आणत असताना वाटेतच सीमा यांचा मृत्यू झाला.
उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने उपचार न केल्यामुळे सीमा मेश्राम यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे संबंधित डॉक्टरवर कारवाई करून नुकसानभरपाई देण्याची मागणी सर्पमित्र प्रवीण कडू, संदीप बंडावार, किशोर मेश्राम, मनोज सलामे, हरिश्चंद्र मेश्राम यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
घटनेच्या दिवशी सकाळी ९ वाजता संबंधित महिलेने उंदीर चावल्याचे सांगितल्याने टीटीचे इंजक्शन देऊन त्यांना घरी पाठविले. मात्र, दुपारी १२ वाजता त्यांना पुन्हा रुग्णालयात आणले तेव्हा जास्त वेदना होत होत्या. त्यांना छातीत दाटल्यासारखे वाटत होते. परंतु, साप चावल्याची हिस्ट्री नसल्याने साप चावल्याचे उपचार करता आले नाहीत. संबंधित महिला रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने सेवाग्रामला पाठविण्यात आले.
- डॉ. किशोर चाचरकर, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट