कर्जाच्या नावावर लुटणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाईची मागणी
By admin | Published: November 11, 2016 01:48 AM2016-11-11T01:48:03+5:302016-11-11T01:48:03+5:30
मायक्रो फायनान्स कंपनीच्या वतीने तळेगाव व पारर्डी तसेच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सक्तीची वसूली सुरू
महिलांची धडक : जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
वर्धा : मायक्रो फायनान्स कंपनीच्या वतीने तळेगाव व पारर्डी तसेच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सक्तीची वसूली सुरू असल्याचा आरोप करीत ही वसूली तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पोलीस अधीक्षकांना गुरुवारी सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनातून, मायक्रो फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सध्या सक्तीची वसूूली सुरू आहे. वसूली अधिकारी महिलांना अपमानास्पद वागणूक देत असून घरातील साहित्य जबरी नेण्याची धमकी देत आहेत. सदर प्रकारामुळे कर्ज घेणारे मेटाकुटीस आले आहे. वसूली अधिकारी मद्यधुंद अवस्थेत कर्जाची वसूली करतात. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर प्रकरणी योग्य कारवाई व्हावी, यासाठी तळेगाव पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आल्या; परंतु, तेही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. ही सक्तीची वसूली बंद करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश देशमुख, रुखमा टिपले, संगीता नारणवरे, वनिता ढोक, सूर्यकांता मरस्कोल्हे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)