शासकीय जागेची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
By admin | Published: January 12, 2017 12:34 AM2017-01-12T00:34:27+5:302017-01-12T00:34:27+5:30
महाराष्ट्र शासनाच्या मालकीची ८०० चौ.फुट आबादी जागा परस्पर विकून लाखो रूपये हडप करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.
आर्वी : महाराष्ट्र शासनाच्या मालकीची ८०० चौ.फुट आबादी जागा परस्पर विकून लाखो रूपये हडप करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. तसेच सदर जागा खरेदी करून भ्रष्ट कारभाराला मदत करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करून सदर जमीन शासनाच्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने केली आहे. यावर कार्यवाही केली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
शहरात अनेक जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. माजी नगरसेवक व मोतीराम वानखेडे यांनी येथील जागेवर अतिक्रमण केले आहे. पदाचा गैरवापर करीत सदर जागा नगर परिषदेच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या स्वत:च्या नावावर केली. प्रत्यक्षात त्यांच्या ताब्यात फक्त १०० चौ.फुट जागा होती. मात्र कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून २०१३ मध्ये दस्ताऐवजामध्ये परस्पर फेरफार करून मालमत्ता रजिस्टरवर १०० चौरस फुटाऐवजी ८०० चौरस फुटांची नोंद घेतली. सदर जागा शासकीय मालकीची आहे हे माहीत असताना मोतीराम वानखेडे यांच्या वारसांनी ती जागा परस्पर विकून १ लाख ८० हजार रूपये हडप केले आहे. नगर परिषद दस्ताऐवजात फेरफार करून नोंद घेतलेली जास्तीची ७०० फुट जागा नगर परिषदेने ताब्यात घेवून मालमत्ता रजिस्टरवर घेतलेली नोंद रद्द करण्यात यावी. शासकीय जागेची परस्पर खरेदी विक्री करून लाखो रूपये हडप करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच महादेवबाबा वॉर्डातील प्राथमिक शाळेजवळील आयुर्वेदीक दवाखाना क्र. १ मधील साहित्य व सागवानचे फर्निचर चोरीला गेल्याची तक्रार दिली. यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. अज्ञात इसमांनी दवाखाना तोडून येथील साहित्याची तोडफोड केली असून वस्तू लंपास केल्या. याची चौकशी करून कारवाईची मागणी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना भाजयुमोचे बाळा जगताप यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे. (तालुका/शहर प्रतिनिधी)