आरटीओ कार्यालयात दलालांची मनमर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:43 PM2018-09-26T23:43:17+5:302018-09-26T23:43:44+5:30

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या दलालांच्या मनमर्जीने कळस गाठला आहे. नुकतीच तेथील एका कर्मचाऱ्यांला मारहाण करण्यापर्यंतचीही मजल दलालांची पोहोचल्याने सदर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.

Demand of the brokers in the RTO office | आरटीओ कार्यालयात दलालांची मनमर्जी

आरटीओ कार्यालयात दलालांची मनमर्जी

Next
ठळक मुद्देवाहनधारकांची केली जातेय पिळवणूक : काही कर्मचाऱ्यांचे साटेलोटे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या दलालांच्या मनमर्जीने कळस गाठला आहे. नुकतीच तेथील एका कर्मचाऱ्यांला मारहाण करण्यापर्यंतचीही मजल दलालांची पोहोचल्याने सदर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. याच पार्श्वभूमीवर लोकमतच्या प्रतिनिधीने बुधवारी आरटीओ कार्यालयाचा फेरफटका मारला असता संपूर्ण कार्यालयात दलालांच्या मनमर्जीनेच विविध कामे होत असल्याचे दिसून आले.
छोटे-मोठे व दुचाकी तसेच तीन चाकी वाहन चालविण्याचा शिकाऊ आणि जास्त अवधीपर्यंतचा परवाना मिळविण्यासाठी या कार्यालयात दररोज जिल्ह्यातील शेकडो नागरिक येतात. इतकेच नव्हे तर वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना प्राप्त करणाºयांसाठी क्रमप्राप्त असलेली परीक्षा देण्यासाठी दररोज येथे लांबच लांब रांग लागते. परंतु, या कार्यालयात अनेक कामे दलालांच्या माध्यमातूनच झटपट पूर्णत्त्वास जात असल्याचे दिसून येते. शिवाय जो व्यक्ती दलालांच्या माध्यमातून न जाता आपले काम करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या प्रकरणात कर्मचाºयांसह अधिकारी त्रुट्याच काढून त्यांना दलालांच्या माध्यमातून प्रकरण सादर करण्यासाठी अप्रत्यक्ष बांधिल करीत असल्याचे दिसून येते. दलालही कामाचे स्वरूप पाहून नागरिकांकडून कमी अधिक पैसे उकळत असल्याचे बघावयास मिळाले. शिवाय तशी चर्चाही या कार्यालयाच्या परिसरात होत असल्याचे दिसून आले.
इतकेच नव्हे तर दलालाच्या माध्यमातून जाणाऱ्या प्रकरणांवर काही विशिष्ट कोडींग लिहिले जात असल्याने प्रकरणाची पडताळणी करण्याची जबाबदारी असलेले कर्मचारी ते कोडींग पाहून ती फाईल एका टेबलावरून दुसºया टेबलावर झटपट सरकवितो. त्यामुळे या कार्यालयात लक्ष्मी दर्शनाचे मोह जपत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याची विविध कामानिमित्त येणाºया नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असून कामात पारदर्शकता यावी यासाठी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
अधिकार पत्र सुविधेचा गैरवापर?
आरटीओ कार्यालयातील कुठलेही काम पूर्णत: नेण्यासाठी एखाद्या व्यक्ती वारंवार आपला वेळ देऊ शकत नसल्याने शासनाने अधिकार पत्र ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली. परंतु, वर्धेच्या आरटीओ कार्यालयात या सुविधेचा सर्रासपणे गैरवापर होत असल्याचे बुधवारी दिसून आले. या कार्यालयात दलाल म्हणून मिरवणारे सुमारे २० व्यक्ती नागरिकांकडून अधिकार पत्र लिहून घेत नागरिकांची विविध कामे करून देत आहेत. इतकेच नव्हे तर हे व्यक्ती नागरिकांकडून सदर कामे करून देण्यासाठी मोठी रक्कमही घेत आहेत. उल्लेखनिय म्हणजे या कार्यालयात एकही अधिकृत एजन्ट नसल्याचे सांगण्यात आले.
कार्यालयाबाहेर बसते पंगत
येथील प्रशासकीय इमारतीच्या मागील भागात असलेल्या वाहनतळाच्या आवारात व सदर इमारतीच्या मुख्य द्वाराच्या बाजूला सध्या दलालांची पंगत राहत असल्याचे दिसून येते. एखाद्या व्यक्तीने त्या पंगतीतील एखाद्याला आरटीओ कार्यालयातील एखाद्या कुठल्याही साध्या गोष्टीची विचारणा केली असता त्यांच्याकडून त्या व्यक्तीची दिशाभूलच केली जात आहे. त्यामुळे या मनमर्जी करणाºया दलालांना आरटीओ कार्यालयाच्या आवारातून हद्दपार करण्याची मागणी आहे.
प्रकरणांवर दलालांच्या नावाची कोडींग
वाहन चालविण्याचा जादा कालावधीचा स्थायी परवाना मिळविण्यासह वाहन फेरफार आदी प्रकरणे सादर करताना दलालांच्यावतीने सदर प्रकरणावर एक छोटीशी कोडींग केली जात आहे. ती कोडींग बघूनच अनेक प्रकरणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झटपट निकाली काढले जात असून त्याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे.

ज्यांना वेळ नसतो त्यांच्यासाठी शासकीय नियमानुसार अधिकार पत्राची सुविधा आहे. प्रत्यक्ष व्यक्ती हजर नसल्यास आम्ही अधिकार पत्राला ग्राह्य मानून विविध कामे पूर्णत्वास नेतो. आमचे कार्यालय सार्वजनिक असल्याने कोण विविध कामानिमित्त आलेला नागरिक व कोण एजन्ट हे आम्हाला ओळखणे कठीणच आहे.
- विजय तिराणकर, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.

Web Title: Demand of the brokers in the RTO office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.