वाळू व्यावसायिकाने तहसीलदाराच्या दालनात घेतले विष; प्रशासनात उडाली खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 11:35 AM2022-06-04T11:35:23+5:302022-06-04T12:50:16+5:30
शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयात घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली.
समुद्रपूर (वर्धा) :वाळूची अवैधरीत्या वाहतूक करताना तहसीलदारांनी जप्त केलेला टिप्पर सोडण्याची मागणी करीत वाळू व्यावसायिकाने तहसीलदारांच्या दालनातच कीटकनाशक घेतले. शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयात घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. व्यावसायिकाला लागलीच उपचाराकरिता सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रवीण शंकर शेंडे (३५) रा. मांडगाव असे विष प्राशन केलेल्या वाळू व्यावसायिकाचे नाव आहे. २२ एप्रिल रोजी वणा नदीच्या पात्रातून विनापरवाना वाळूची वाहतूक करताना महसूल विभागाने त्याचा टिप्पर जप्त केला. यामुळे प्रवीणचा व्यवसाय ठप्प पडल्याने त्याची आर्थिक कोंडी झाली होती. त्यामुळे प्रवीणने शुक्रवारी दुपारी तहसीलदार राजू रणवीर यांच्या दालनात जाऊन त्यांना ट्रक सोडण्याची विनवणी केली. तहसीलदारांनी या प्रकरणाचा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला असून त्यांच्याशी संपर्क करण्याच्या सूचना केल्या. तेवढ्यात व्यथित झालेल्या प्रवीणने खिशातील कीटकनाशकाचा डब्बा काढून तोंडाला लावला. (Revenue Department Seized Truck for Illegal Sand Transportation)
ही बाब तहसीलदार रणवीर यांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच खुर्चीवरून उठून प्रवीणकडे धाव घेत त्याच्या हातातील डब्बा खाली पाडला. यादरम्यान दोन-तीन घोट त्याने घेतले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. तहसीलदारांनी तातडीने प्रवीणला तहसीलच्या वाहनातून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी समुद्रपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मांडगाव येथील प्रवीण शेंडे या वाळू व्यावसायिकाचा टिप्पर नदीपात्रातून विनापरवानगी वाळूची वाहतूक करताना पकडला होता. यावर कायदेशीर कारवाई करून टिप्पर जप्त करण्यात आला. आज त्याने दालनात येऊन टिप्पर सोडण्याचा आग्रह धरला. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण, त्याने खिशातून विषाचा डब्बा काढून तोंडाला लावला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
राजू रणवीर, तहसीलदार, समुद्रपूर