रासायनिक खत वाढल्याने शेणखताला मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 05:00 AM2020-12-13T05:00:00+5:302020-12-13T05:00:16+5:30
कारंजा तालुक्यातील जसापूर येथील शेतकरी किशोर श्रावण बन्नगरे यांनी रासायनिक शेती कमी करुन शेणखत वापरुन शेतात जीवमृत बनवून शेणखताचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहे. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क विविध वनस्पतींपासून जैविक किडनाशके तयार करण्याचे काम ते करीत आहे. रासायनिक शेतीतील मालाला दरही कमी मिळतो पपईचे पीक ते जैविकपद्धतीने पिकवत असल्याने पपई पिकाला मोठी मागणी असून दरही चांगला मिळत आहे.
विनोद घोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : एकीकडे रासायनिक खतांचे भाव वधारले असून रासायनिक खताच्या वापरामुळे उत्पादनात वाढ झालेली आहे. पण, रासायनिक खताच्या अतिरेकी व असंतुलीत वापरामुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत आहे. तसेच रासायनिक खते महागडी असल्यामुळे उत्पादन खर्चात देखील वाढ झाली आहे. शिवाय उत्पदीत मालाची, जमिनीची पोत खालावली असून मानवाच्या आरोग्यावर देखील याचा विपरीत परिणाम होत आहे. या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकणातून शेतकऱ्यांसाठी शेणखत, सेंद्रीय खत वापरणे काळाची गरज झाली आहे.
कारंजा तालुक्यातील जसापूर येथील शेतकरी किशोर श्रावण बन्नगरे यांनी रासायनिक शेती कमी करुन शेणखत वापरुन शेतात जीवमृत बनवून शेणखताचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहे. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क विविध वनस्पतींपासून जैविक किडनाशके तयार करण्याचे काम ते करीत आहे. रासायनिक शेतीतील मालाला दरही कमी मिळतो पपईचे पीक ते जैविकपद्धतीने पिकवत असल्याने पपई पिकाला मोठी मागणी असून दरही चांगला मिळत आहे.
शेखणत शेतात तयार करून त्याचा वापर केल्यास जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यास मदत होईल, त्याचप्रमाणे उत्पादीत मालाची प्रत सुधारून उत्पादन खर्चात सुद्धा बचत होईल.
शेणखत, कंपोस्ट खत, गांडुळखत यासारखी सेंद्रीय खते शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तयार करण्याची गरज असल्याचे मत शेतकरी किशाेर बन्नगरे यांनी सांगितले.
रासायनिक खताचे विपरित परिणाम
प्रत्येक क्षेत्रात, व्यवसायात कमालीची स्पर्धा वाढली आहे. शेती व्यवसायातही अधिक उत्पादन कसे घेता येईल, याकडे साऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. यामुळे उत्पादन खर्चातही वाढ झाली. महागड्या रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर सध्या वाढला आहे. त्यामुळे जमिनीतील अन्नद्राव्ये नष्ट होत असून जमीन कडक येत आहे. यामुळे जमिनीची पत घसरत आहे. रासायनिक खताच्या वापरामुळे मानवाच्या आराेग्यासही हानीकारक ठरत असल्याचे दिसून येत आहे.
शेणखत वापरल्यास उत्पादन खर्चात बचत
शेणखताच्या वापराने जमिनीची सुपिकता टिकुन राहते. आणि विषमुक्त अन्न धान्य मिळाल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाहीत. त्याचप्रमाणे उत्पादनात देखील वाढ होण्यास मदत होईल आणि उत्पादन खर्चातही मोठी बचत होईल. त्यामुळे शेतकऱ्याने शेतात शेणखत तयार करण्यास सुरुवात करण्याची गरज आहे. असे झाल्यास उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे.
रासायनिक आणि शेणखतांचे दर
शेखणत ५ हजार रूपये प्रती ट्रॉली, तर रासायनिक खत, सर्वच खत प्रती ५० किलोची बॅग, युरीया २५५ रूपये, १०:२६:२६ -१३५० रूपये, डीएपी - १४५० रूपये, २०:२०:० - १०५० रूपये, १८:१८:१०- १०५० रूपये, सुपर फॉस्फेट -४५० रूपये बॅग अशी रासायनिक आणि शेणखताचे दर आहेत.