काय सांगता! दोन लाखांची मागणी, एका लाखावर नागपूर पोलिसांचे ‘सेटलमेंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 06:09 PM2021-10-07T18:09:05+5:302021-10-07T18:18:15+5:30

२ ऑक्टोबर २०१९ पासून नागपूर पोलीस एकाच चोराला वारंवार आणून सराफा व्यावसायिकांना धमकावित आहेत. हा प्रकार मागील तीन वर्षांपासून सुरू आहे.

Demand for Rs 2 lakh, settlement of Nagpur police on Rs 1 lakh | काय सांगता! दोन लाखांची मागणी, एका लाखावर नागपूर पोलिसांचे ‘सेटलमेंट’

काय सांगता! दोन लाखांची मागणी, एका लाखावर नागपूर पोलिसांचे ‘सेटलमेंट’

Next
ठळक मुद्देखोट्या चोरीची जबरन वसुली : सराफा, सुवर्ण असो.चे एसपींना निवेदन

वर्धा : चोरी, लुटपाट, लुबाडी आदींच्या घटनेप्रकरणी आपण पोलिसांत जातो, तक्रार नोंदवतो. मात्र, पोलीसच जर खोट्या चोरीच्या गुन्ह्यांत तुम्हाला लुबाडत असतील तर? असाच एक लुबाडीचा प्रकार समोर आला आहे.

मागील तीन वर्षांपासून चोरीच्या घटनेतील एकाच आरोपीला नागपूर पोलीस पुलगाव येथे नेत आहेत. त्या आरोपीला काही सराफा दुकानांमध्ये नेऊन खोट्या चोरीच्या गुन्ह्यांत बळजबरी पैशासाठी तगादा लावत आहेत. दोन लाखांची मागणी करून एका लाखावर सेटलमेंट करीत असल्याने त्रस्त झालेल्या सराफा व सुवर्ण असोसिएशनच्या वतीने गुरुवारी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या प्रति पोलीस महासंचालकांकडेही पाठविण्यात आल्या. तसेच आमदार रणजित कांबळे यांनाही निवेदन देण्यात आले.

२ ऑक्टोबर २०१९ पासून नागपूर पोलीस एकाच चोराला वारंवार आणून सराफा व्यावसायिकांना धमकावित आहेत. हा प्रकार मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. भीतीपोटी सराफा व्यावसायिक काही पैसे आणि दागिने देऊन आपली सुटका करून घेत आहेत. ३० नोव्हेंबर २०२० रोजी नागपूर पोलीस संजय मून नामक चोरट्याला पुलगाव येथे घेऊन आले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेज न पाहताच चोरासोबत व्यावसायिकाला अटक करण्याची धमकी देत होते. अखेर पोलिसांनी दागिने आणि पैसे घेऊन स्वत:ची सुटका केली.

४ नोव्हेंबर २०२१ रोजी किशोरकुमार अभयकुमार बदनोरे यांच्या दुकानात पुन्हा संजय मून नामक चोराला नागपूर पोलीस घेऊन आले. इतकेच नव्हे, तर यापूर्वी देखील कधी नागपूर, अजनी तर कधी धंतोली पोलीस ठाण्यातून आलो असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ४ रोजी पोलीस दुकानात आले असता संजय बदनोरे हे राजस्थान येथे गेले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांचे वडील किशोरकुमार बदनोरे यांना उचलून घेऊन जाण्याची धमकी दिली. अशातच त्यांची प्रकृती बिघडली, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सराफा व्यावसायिकांनी वारंवार विनवण्या केल्यावरही पोलीस त्यांच्यावर दबाव टाकत होते. अखेर त्यांनी घाबरून जात दुसऱ्या व्यावसायिकाकडून दागिने आणि रोख आणून पोलिसांना देत स्वत:ची सुटका केली. याकडे तत्काळ लक्ष देत वरिेष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी सराफा व सुवर्ण असो.च्या वतीने पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना निवेदनातून केली.

पूलगाव पोलीस अनभिज्ञच...

जर एखाद्या प्रतिष्ठानात कारवाईसाठी बाहेर जिल्ह्यातील पोलीस गेल्यास त्या पोलिसांना कारवाई करण्यापूर्वी तसेच चौकशी करण्यापूर्वी स्थानिक पोलीस ठाण्यात तशा सूचना द्याव्या लागतात. मात्र, कारवाई आणि चौकशी करतेवेळी पूलगाव ठाण्यातील एकही पोलीस तिथे उपस्थित नव्हता. तसेच स्वत:ला नागपूर पोलीस म्हणणारे साध्या गणवेशात येत असल्याने ते खरंच पोलीस आहेत का, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Demand for Rs 2 lakh, settlement of Nagpur police on Rs 1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.