शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी एसडीओ कार्यालयावर धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 09:29 PM2018-05-31T21:29:35+5:302018-05-31T21:29:35+5:30
शासनाने बंद केलेले तूर व चणा खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे. खरेदी केलेल्या मालाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करावी, बोंडअळी नुकसान भरपाईची जाहीर केल्याप्रमाणे ३०,८०० रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासह अन्य मागण्यांकरिता कृउबास सभापती अॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शासनाने बंद केलेले तूर व चणा खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे. खरेदी केलेल्या मालाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करावी, बोंडअळी नुकसान भरपाईची जाहीर केल्याप्रमाणे ३०,८०० रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासह अन्य मागण्यांकरिता कृउबास सभापती अॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी एसडीओ समाधान शेंडगे यांना निवेदन दिले.
शहरातील प्रमुख मार्गाने फिरून शेतकऱ्यांचा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी निवेदनातून आंदोलकांनी शासनाने मागील वर्षी जाहीर केलेले सोयाबीनचे २०० रुपये प्रती क्विंटल अनुदान त्वरित वाटप करावे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ जाहीर करून एक वर्ष लोटले; पण पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप रक्कम जमा झाली नाही. शेतकरी कर्जमाफी योजनेतील संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून नवीन कर्जवाटप करण्याचे बँकांना आदेश द्यावे. शेतकरी आर्थिक संकटात सापडण्यास शासनाचे आयात -निर्यात धोरण, साठाबंदी कायदा व जीवनावश्यक वस्तू कायदा जबाबदार आहे. शासनाचे धोरण कारणीभूत असल्याने शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव पडलेले असताना त्याचा फायदा सामान्यांना मिळत नाही. पेट्रोल, डिझेल व गॅस यावरील कर कमी करून आंतरराष्ट्रीय बाजार -भावाचा लाभ जनतेला देऊन दिलासा द्यावा. शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन विहिरीची व्यवस्था करावी. वीज पुरवठा त्वरित द्यावा आदी मागण्या एसडीओमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत करण्यात आल्या.
अॅड. कोठारी यांच्या नेतृत्वातील मोर्चात समुद्रपूर कृउबास सभापती हिम्मत चतुर, हरिष वडतकर, मधुकर डंभारे, उत्तम भोयर, मधुसूदन हरणे, सुरेश सातोकर, राजू मंगेकर, विनोद वानखेडे, दिगांबर चांभारे, तेजस तडस, अशोक वांदिले, राजेश थोरात, सुरेंद्र कुकेकार, धनंजय बकाणे, भूषण पिसे यासह शेतकरी सहभागी झाले होते.