सावंगी ठाणेदाराच्या निलंबनाची मागणी
By admin | Published: January 3, 2017 01:03 AM2017-01-03T01:03:41+5:302017-01-03T01:03:41+5:30
सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात निरीक्षक म्हणून संतोष शेगावकर कार्यरत असून त्यांच्या आशीर्वादाने सावंगी
९० महिलांच्या स्वाक्षऱ्यांचे एसपींना निवदेन
वर्धा : सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात निरीक्षक म्हणून संतोष शेगावकर कार्यरत असून त्यांच्या आशीर्वादाने सावंगी परिसरात अनेक अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करीत सदर ठाणेदाराला निलंबित करण्याची मागणी या भागातील महिलांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना साकडे घालत एका निवेदनातून केली आहे.
महिलांनी दिलेल्या निवेदनानुसार, ठाणेदार शेगावकर हे नेहमी मद्य प्राशन करुन असतात. सावंगी (मेघे) परिसरातील दौड यांचे हॉटेल असून या हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याचा आरोपही यावेळी महिलांनी केला आहे. या व्यवसायाला ठाणेदार शेगावकर यांचे पाठबळ असून त्याची माहिती परिसरातील लोकांना आहे. तसेच दौड यांच्या मालकीचे अग्निहोत्री कॉलेजजवळ फ्लॅट असून या फ्लॅटमध्ये देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याची माहिती पोलिसांना असून त्यांनी येथे सुद्धा छापा टाकला होता. छाप्यामध्ये अवैध हत्यार सुद्ध सापडले होते. दौड परिवारातील लोकांसोबत या ठाणेदाराचे घनिष्ठ संबंध व साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे.
यामुळे अशा ठाणेदाराची नार्को टेस्ट करण्याची मागणी महिलांच्या तब्बल ९० स्वाक्षऱ्या असलेल्या निवदेनातून करण्यात आली आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास परिसरातील हजारो महिला संघटनेला आंदोलन, उपोषणाला बसावे लागेल. तेव्हा सदर निवेदनाची गंभीर दखल घेत ठाणेदाराचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)
ठाणेदार शेगावकर यांच्या विरोधात आणि त्यांच्या समर्थनार्थ काही महिलांनी निवदेन दिले आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. याकरिता काही कालावधी लागेल. या चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक, वर्धा