आदिवासींच्या हक्कासाठी धरणे-आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 10:27 PM2018-09-12T22:27:20+5:302018-09-12T22:28:37+5:30
आदिवासींच्या संविधानिक न्याय व हक्कासाठी एस.सी., एस.टी. शिक्षण हक्क परिषदेच्यावतीने बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे-आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आदिवासींच्या संविधानिक न्याय व हक्कासाठी एस.सी., एस.टी. शिक्षण हक्क परिषदेच्यावतीने बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे-आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सन २०१५-१६ पर्यंतची थकीत सुवर्ण जयंती आदिवासी शिष्यवृत्ती व भारत सरकार शिष्यवृत्ती योजना त्वरीत वितरीत करावी. महा डी.बी.टी.योजना त्वरीत बंद करावी. वसतीगृहातील विद्यार्थ्यांची जेवनाची व्यवस्था पूर्वी प्रमाणे वसतीगृहात करण्यात यावी. आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा १ लाख ८ हजार रद्द करुन किमान ८ लाख करावी. पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयं योजनेची ताबडतोब अंमलबजावणी करावी. बार्टीच्या धर्तीवर टी.आर.टी.आय.पुणेच्या मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा व तत्सम मार्गदर्शन केंद्र जिल्हा पातळीवर सुुरू करावे. आदिवासी संदर्भात जात पडताळणी कार्यालय व आदिवासी प्रकल्प कार्यालय वर्धेत सुरु करावे. बंद पडलेल्या शासकीय आश्रमशाळेत तालुका व जिल्हा पातळीवर एकलव्य इंग्रजी शाळा सुरु करण्यात यावी. आदिवासी विभागामार्फत महिला बचत गट, शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादन कंपनी, लघुउद्योग, कुटीर उद्योग याकरिता एन.बी.अंतर्गत प्रशिक्षण देऊन निधी उपलब्ध करुन द्यावा.शबरी घरकुल योजनेचा लक्षांक किमान १ हजार करण्यात यावा. आदिवासी गावांमध्ये तसेच तालुका व जिल्हा ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत समाज भवन सांस्कृतिक कलाभवन देण्यात यावे. यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात जिल्हा संयोजक मारोती उईके, रविंद्र थुल, महिला संघटिका डॉ.ज्योती लुंगे, अरविंद खैरकार यांच्या नेतृत्वात महेंद्र शिंदे, शंकर सराटे, उदाराम कन्नाके, किसन वाघमारे, पुंडलीक उईके, अनु सुमन बडा, शिला मून, पद्माकर कांबळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. या मागण्यांचे निवेदन संबंधित मंत्र्यांसह विभागाला पाठविण्यात आले. या आंदोलन मंडपाला महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अॅड.चारुलता टोकस, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल कोल्हे, शहर अध्यक्ष सुधीर पांगूळ, माजी सभापती लक्ष्मण कांबळे, अनिकेत भोयर, सुरेश राऊत व आकाश बोंदाडे यांनी भेट दिली.