आंदोलने व मोर्चापेक्षा मतपेटीतून शक्ती दाखवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:01 AM2018-12-01T00:01:31+5:302018-12-01T00:02:07+5:30
राज्यात सत्तेवर आलेल्या आतापर्यंतच्या सर्वच सरकारने ओबीसींच्या मुळावर येणारे धोरण अंगिकारले. फक्त व्ही.पी.सिंग यांचे सरकार याला अपवाद ठरले. १९३१ च्या जनगणनेनुसार ५२ टक्के ओबीसी असतानाही कुठे ६ टक्के तर कुठे १६ टक्के आरक्षण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यात सत्तेवर आलेल्या आतापर्यंतच्या सर्वच सरकारने ओबीसींच्या मुळावर येणारे धोरण अंगिकारले. फक्त व्ही.पी.सिंग यांचे सरकार याला अपवाद ठरले. १९३१ च्या जनगणनेनुसार ५२ टक्के ओबीसी असतानाही कुठे ६ टक्के तर कुठे १६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे आता बहूजन व ओबीसी स्वस्थ बसणार नाहीत. आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलने व मोर्चा काढून शक्ती खर्च करण्यापेक्षा मतपेटीतून शक्ती दाखविली जाईल, असे मत लोकजागरचे अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांनी पत्र परिषदेतून व्यक्त केले.
स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेला लोकजागरचे महाराष्ट्र सचिव डी.व्ही.पडोळे, संयोजक बाबाराव भोयर व जिल्हाध्यक्ष मनीष नांदे उपस्थित होते. पुढे बोलतांना वाकुडकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीवर डोळा ठेवून मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला असून तो गोंधळ निर्माण करणारा आहे. आमचा कोणत्याही जातीच्या आरक्षणाला विरोध नाही, पण १६ टक्के आरक्षण कोणत्या आधारे जाहीर केले हा प्रश्नच आहे. आतपर्यंत एससी, एसटी व एनटी यांना संख्येप्रमाणे आरक्षण दिले.परंतू ओबीसींची संख्या जास्त असतानाही त्यांना सावत्रपणाची वागणूक मिळाली आहे. त्यामुळे ५२ टक्के लोकसंख्या असतांनाही आरक्षणात ओबीसींचा टक्का किती?असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच शासनाने सर्व प्रवर्गाची जनगणना करावी, असेही ते म्हणाले.
नव्या दमाचं नव नेतृत्व
या दोन्ही पक्षांच्या सरकारला जनता आता कंटाळली आहे. त्यामुळे सर्व ओबीसी आणि बहूजनांनी एकत्र येऊन नव्या दमाचं नव नेतृत्व देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सुरुवातील वर्ध्यातच लोकसभा निवडणूक लढविण्याचे निश्चित केले होते. परंतू आता वाढता प्रतिसाद व नागरिकांच्या आग्रहास्तव सध्या पाच लोकसभा निवडणूकीसाठी नेतृत्व तयार केले जाणार असल्याचेही यावेळी ज्ञानेश वाकु डकर यांनी सांगितले.
वर्ध्यात यात्रेचा होणार समारोप
विदर्भात ‘ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकार’ हे ब्रीद घेऊन निघालेल्या लोकजागर यात्रेचा समारोप ५ डिसेंबरला दुपारी १२ वाजता होणार आहे. सर्कस मैदानावर होणाऱ्या सभेला प्रमुख पाहूणे म्हणून बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सुरेश माने, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे,ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप ढोबळे व पॉलिटिकल युनिटी कॅम्पेनचे संयोजक इस्माईल बाटलीवाला यांची उपस्थिती राहणार आहे. या सभेला ओबीसी व बहुजन समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लोकजागर अभियानच्यावतीने करण्यात आले आहे.