चार वर्षांत डेंग्यूने जिल्ह्यात ९ जणांचा मृत्यू
By admin | Published: May 16, 2017 01:16 AM2017-05-16T01:16:48+5:302017-05-16T01:16:48+5:30
मागील काही वर्षांत डेंग्यूच्या आजाराने सर्वत्र थैमान घातले होते. एडीस इजिप्टी नावाच्या डासापासून होणाऱ्या या आजारामुळे नागरिक त्रस्त होते.
जागतिक डेंग्यू दिन : ५४६ रुग्णांची झाली नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील काही वर्षांत डेंग्यूच्या आजाराने सर्वत्र थैमान घातले होते. एडीस इजिप्टी नावाच्या डासापासून होणाऱ्या या आजारामुळे नागरिक त्रस्त होते. २०१३ पासून चार वर्षांत जिल्ह्यात तब्बल ५४६ नागरिकांना डेंग्यूची लागण झाली होती. यातील ९ जणांनी मृत्यूला कवटाळले; पण २०१७ मध्ये अद्याप एकाही रुग्णाची नोंद नाही.
जिल्ह्यात डेंग्यूचे २०१४ मध्ये सर्वाधिक थैमान होते. या वर्षात ३६४ रुग्णांची नोंद तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०१५ मध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला तर २०१३ आणि २०१७ मध्ये तशी नोंद नाही. डेंग्यू रोखण्याचा जनजागृती व स्वच्छता हा एकमेव पर्याय आहे. यामुळेच देशातही १६ मे हा दिवस जागतिक डेंग्यू दिन म्हणून पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबाबत व्यापक जनजागृती व्हावी व डेंग्यू हद्दपार व्हावा, हा या मागील उद्देश आहे. डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडिस इजिप्टी नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते. रांजण, सिमेंटचे टाके, टाके, टाकावू वस्तू, प्लास्टिक बकेट, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, टायर्स, इलेक्ट्रॉनिक्स कचरा, शोभेच्या कुंड्या, फुलदाण्या, कुलर्स आदींत साठलेले पाणी यात डास अळी होते. पाणी आठ दिवसांपेक्षा अधिक दिवस साठवून ठेवल्यास हा डास अंडी घालून अळी व कोषानंतर डासात रूपांतर होत असते. यासाठी पाणी आठ दिवसांपेक्षा अधिक काळ साठवू नये, अशा सूचना आरोग्य यंत्रणेकडून दिल्या जातात. सध्या उन्हाळा सुरू असून दुष्काळजन्य स्थिती असल्याने पाणी पुरवठा कमी झाला. परिणामी, जनतेत पाणी साठविण्याची प्रवृत्ती आढळते. या पाण्यात एडिस इजिप्टी डास अंडी घालून डासोत्पत्ती होते. डास उत्पत्ती, डेंग्यू नियंत्रण लोकसहभाग असल्यास शक्य आहे. जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांनी दक्षता घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
डेंग्यू ताप टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता
डेंग्यूचा प्रसार करणारे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतात. आपल्या घराच्या सभोवताल पाणी तर साचलेले नाही ना, याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. पाण्याची भांडी व टाकी झाकून ठेवावी. कुलर रिकामे करून कोरडे करावेत. डेंग्यूचा डास दिवसा चावणार असल्याने संपूर्ण अंग झाकेल, असेच कपडे वापरावेत. डेंग्यूच्या उपचारावर विशेष औषधी वा लस उपलब्ध नाही. ताप कमी करण्याकरिता पॅरासिटामॉल घेता येते. स्वत: एस्प्रिन व इब्रुफेनचा वापर करू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डेंग्यूच्या प्रत्येक रुग्णास प्लेटप्लेटची गरज नसते. योग्य उपचार योग्य वेळीच घ्या. उपाशी पोटी औषधोपचार घेऊ नका, असे आवाहन जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे यांनी केले आहे.
डेंग्यू तापाची लक्षणे
एकाएकी तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्रायुदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भुक मंदावणे, तहाण लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापात चढउतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, रक्त मिश्रीत वा काळसर शौचास होणे, पोट दुखणे आदी डेंग्यूची लक्षणे आहेत.