कोरोनापेक्षा डेेंग्यू भारी, आता सर्वांनी घ्यावी खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 05:00 AM2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:01:01+5:30
डेंग्यूचा आजार दरवर्षीच डोके वर काढतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्यांचे रुपांतर डासात होते. हे डास दिवसाच चावा घेत असल्याने ‘छोटी छोटी युक्ती, करी डेग्यू पासून मुक्ती’ अशी आरोग्य विभागाच्या जनजागृतीतील म्हण प्रचलित आहे.
आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचे संकट कायम असतानाच आता पावसाळा काही दिवसांवर आला आहे. यादरम्यान काही ठिकाणी पाण्यांचा तुटवडा जाणवायला लागल्याने नागरिकांकडून पाण्याची साठवणूक केली जाते. त्याच साठविलेल्या पाण्यामध्ये एडिस इजिप्टाय डास अंडी घालतात. त्यातून डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू या आजाराचा प्रसार होतो. या आजारामुळे गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे कोरोनापेक्षाही डेंग्यूचा मृत्यूदर जास्त असल्याने आता कोरोनासोबतच डेंग्यूचीही खबरदारी घ्यावी लागणार आहे.
डेंग्यूचा आजार दरवर्षीच डोके वर काढतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्यांचे रुपांतर डासात होते. हे डास दिवसाच चावा घेत असल्याने ‘छोटी छोटी युक्ती, करी डेग्यू पासून मुक्ती’ अशी आरोग्य विभागाच्या जनजागृतीतील म्हण प्रचलित आहे. रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दु:खीचा त्रास होतो. उलट्या होणे, डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होणे, अशक्यतपणा, भुक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, अशी लक्षणे दिसून येतात. या आजारामध्ये रुग्णांचे रक्तपेशी झपाट्याने कमी होऊन रुग्णाचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. कोरोना हा आजार नवा असला तरी त्याच्यापासून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ ५ टक्केच आहे पण, डेंग्यू आजार आपल्या सर्वांच्या माहितीतील असून त्याचे प्रमाण कोरोनोपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे आज जागतिक डेंग्यू दिनानिमित्ताने घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे, नाल्यांची नियिमित स्वच्छता करणे याबाबत संकल्प करुन आरोग्य यंत्रणेला सहकार्य करुया.
नागरीकांनी घ्यावयाची काळजी
आठवड्यातून एकदा पाण्याचे साठे कोरडे करावे, पाण्याचे साठे घट्ट झाकून ठेवावे, कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहेत त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करुन गप्पी मासे सोडावीत. झोपतांना अंगभर कपडे घालावीत. सायंकाळी ६ ते ८ यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारुण घ्यावे. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे व जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ तेलतुंबडे यांनी केले आहे.