देवळी खेळाडूंची पंढरी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:21 AM2019-01-31T00:21:20+5:302019-01-31T00:22:02+5:30
सनातन परंपरेपासून कुस्ती आपला खेळ राहिला आहे. परंतु या कुस्तीला राजाश्रय मिळण्यासाठी शासनस्तरावरील प्रयत्न कमी पडत आहे. अशी कबुली अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : सनातन परंपरेपासून कुस्ती आपला खेळ राहिला आहे. परंतु या कुस्तीला राजाश्रय मिळण्यासाठी शासनस्तरावरील प्रयत्न कमी पडत आहे. अशी कबुली अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. याप्रसंगी नवनिर्मित विदर्भ केसरी खासदार रामदास तडस स्टेडियमचे लोकार्पण त्यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ना. मुनगंटीवार यांनी या स्टेडियमच्या इनडोअर व्यवस्थेसाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा केली.
देवळी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अतिथी म्हणून खासदार रामदास तडस, आमदार डॉ. रामदास आंबटकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे, नादंगाव खंडेश्वरचे नगराध्यक्ष संजय पोकळे, जि.प. सदस्य वैशाली येरावार व मयुरी मसराम, पं.स. सभापती विद्या भुजाडे, नगराध्यक्ष सुचिता मडावी व माजी नगराध्यक्ष शोभा तडस उपस्थित होते.
देवळी येथे झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद महिला कुस्ती स्पर्धेचे सांघीक विजेतेपद पूणे जिल्ह्याने पटकाविले. एकट्या पुणे जिल्ह्याला १०८ गुण मिळाले. कोल्हापूर जिल्ह्यात ७८ गुण प्राप्त करून सांघीक उपविजेतेपद मिळविले. दोन्ही विजेत्या चमूंचा सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते शिल्ड देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार यांनी देवळी ही सर्व खेळाडूंच्या प्रशिक्षणाची नगरी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. लोकसंख्येच्या तुलनेत जगात पहिल्या देशाने आॅलम्पिकमध्ये फक्त २८ मेडल प्राप्त केले. याबद्दल नवल व्यक्त केले. महिला कुस्तीगीरांच्या मानधनासाठी ना. विनोद तावडे यांच्यासोबत बोलून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यानी दिले. खासदार रामदास तडस नेहमीच आपल्या प्रतिस्पर्ध्याला चारही मुंड्या चीत करून विजयी पताका फडकवित आले आहे. याची पुनरावृत्ती पुन्हा होणार आहे. आम्ही दोघेही मंत्री व खासदार म्हणून एकत्र येणार आहो, असे सूचक विधान करून त्यांनी देवळी न.प. च्या विकासकामासाठी १० कोटी तसेच कुस्ती व कबड्डी मॅट उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली.
याप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते महिलांच्या अंतिम कुस्तीची सोडत करण्यात आली. तसेच नगर परिषदेच्या नवीन बांधण्यात आलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक शहीद स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.
खासदार रामदास तडस यांनी सुसज्ज इनडोअर स्टेडियमच्या व्यवस्थेसहीत कुस्तीपटू खाशबा जाधव यांना पद्भूषण, महिला कुस्तीगिरांना मानधन, देवळी नगर परिषदेसाठी विकास निधीची मागणी केली.
याप्रसंगी आमदार रामदास आंबटकर यांनी खासदार तडस यांची विकासपुरुष म्हणून स्तुती करून त्यांनी राहत्या गावात सुध्दा स्पोर्टमनशिपची ओळख करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक पंकज तडस यांनी केले. संचालन प्रा. पंकज चोरे यांनी केले. कार्यक्रमाला माजी जि.प.सभापती मिलिंद भेंडे, विलास कांबळे, जि.प.सदस्य राणा रननवरे, जयंत कावळे, किशोर गव्हाळकर, जि.प.सदस्य पंकज सायंकार, न.प. उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, न.प. सदस्य नंदु वैद्य, मारोती मरघाडे, मिलिंद ढाकरे, कल्पना ढोक, सारीका लाकडे, सुनीता तोडाम, सुनीता बकाणे, संध्या कारोटकर व माजी पं.स. सभापती दीपक फुलकरी यांची उपस्थिती होती.
विकास कामांचे उद्घाटन
वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच १० कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांचा शुभारंभ पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात आला.