कृषी विभाग कोमात; कोविडला आवतन मिळतेय जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 05:00 AM2020-06-08T05:00:00+5:302020-06-08T05:00:16+5:30
जिल्ह्यात एकूण १ हजार २१५ कृषी केंद्र आहेत. याच कृषी केंद्रांमध्ये सध्या शेतकरी सोयाबीन, कपाशी, तूर आदींचे बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी केंद्रांमध्ये कुठल्याही परिस्थितीत गर्दी होऊ नये, या ठिकाणी प्रत्येक ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घ्यावे, येणाऱ्या ग्राहकांना हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना संकटातही शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून सध्या बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करीत आहेत. बियाणे आणि खत खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहे. शिवाय त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी कृषी विभागाकडे दिली आहे; पण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्ह्याबाहेरून अप-डाऊन करीत आहे. शिवाय प्रत्यक्षात फिल्डवर जाण्याचे टाळत असल्याने कोरोनासाठी खबरदारीचा उपाय असलेल्या सोशल डिस्टन्सिंगचा कृषी केंद्रांमध्ये फज्जा उडत आहे.
जिल्ह्यात एकूण १ हजार २१५ कृषी केंद्र आहेत. याच कृषी केंद्रांमध्ये सध्या शेतकरी सोयाबीन, कपाशी, तूर आदींचे बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी केंद्रांमध्ये कुठल्याही परिस्थितीत गर्दी होऊ नये, या ठिकाणी प्रत्येक ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घ्यावे, येणाऱ्या ग्राहकांना हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. परंतु, वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेतील कृषी केंद्रांमध्ये बियाणे खरेदीसाठी तोबा गर्दी होत असल्याने तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. इतकेच नव्हे तर काही कृषी केंद्रांमध्ये ग्राहकांना हात धुण्यासाठी सुविधाही नसल्याचे बघावयास मिळते. सोशल डिस्टन्सिंगकडे पाठ दाखवत कृषी केंद्रांमध्ये होणारी गर्दी कोविड-१९ या विषाणूच्या झपाट्याने प्रसार होण्यास कारणीभूत ठरत आहे. तर कृषी केंद्र व्यावसायिकांना वटणीवर आणण्याची जबाबदारी असलेला कृषी विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हा प्रशासनाने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
भरारी पथक नावालाच?
बोगस बियाण्यांना अटकाव घालण्यासाठी कृषी विभागाकडून एकूण नऊ भरारी पथक तयार करण्यात आली आहे. शिवाय कृषी केंद्रांची तपासणीही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. परंतु, या भरारी पथकातील काही अधिकारी कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवत असल्याने सदर भरारी पथक नावालाच काय, असा प्रश्न कृषी तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.
अधीक्षक कार्यालयातून हाकताहेत गाडा
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून वर्धा जिल्ह्यात अनिल इंगळे हे काम पाहत आहे. परंतु, ते सध्या प्रत्यक्ष फिल्ड करीत नसल्याचे आणि कार्यालयात बसूनच कामकाजाचा गाडा हाकत आहेत. या बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल ‘स्विच आॅफ’ होता.
अर्धेअधिक साहित्य दुकानाबाहेरच
अनेक कृषी केंद्र चालकांकडून त्यांच्या दुकानातील साहित्य दुकानांबाहेर ठेवले जात आहे. इतकेच नव्हे तर दुकानांसमोर मनमर्जीनेच वाहने उभी केली जात असल्याने त्या परिसरात बहूदा वाहतुकीची कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा इतर वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी केंद्र व्यावसायिकांकडून करून घ्यावे. शिवाय जो कुणी कृषी केंद्र व्यावसायिक जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत असेल त्याच्यावर दंडात्मकसह फौजदारी कृषी विभागाने करावी. कृषी विभागाचे अधिकारी हयगय करताना निदर्शनास आल्यास जिल्हा प्रशासन त्यांच्यावर कारवाई करेल.
- सुनील कोरडे, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.