११ ग्रा.पं.तील बांधकाम गैरप्रकाराची विभागीय आयुक्तांकडून दखल
By admin | Published: December 4, 2015 02:14 AM2015-12-04T02:14:24+5:302015-12-04T02:14:24+5:30
शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम करण्यात आल्याची तक्रार नागपूर येथील आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आली होती.
प्रमोद मुरारका यांची पत्रपरिषदेत माहिती
वर्धा: शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम करण्यात आल्याची तक्रार नागपूर येथील आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आली होती. यात ग्रामपंचायतीचा बराचसा भाग रिकामा दावून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप मुरारका यांनी केला होता. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत नागपूर येथील विकास विभागाच्या उपायुक्तांनी या संदर्भात चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती प्रमोद मुरारका यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.
यावेळी वर्धा शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचायतीत बांधकाम परवानगी बाबत असलेल्या विविध घोळांची माहितीही त्यांनी दिली. शिवाय या संदर्भात वर्धा पंचायत समितीत माहिती अधिकारात माहिती मागविली असता त्यांच्याकडून अर्धवट माहिती दिली. यात मुरारका यांनी मागविलेल्या एकाही विषयाची माहिती त्यांनी पूर्ण दिली नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. या ११ ग्रामपंचायतीच्या भागात किती बांधकाम झाले या संदर्भात माहिती विचारली असता सहा हजार असे कळविण्यात आले; मात्र ते कोणत्या गावात झाले याची माहिती देण्यात आली नाही. यामुळे तक्रार कर्त्याने अपील केली असता नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त वसंत पाटील यांनी वर्धा पंचायत समितीच्या कारभारावर ताशेरे ओढत त्यांना दंड व शास्ती करण्यासंदर्भात खुलासा मागविला असल्याची माहिती यावेळी मुरारका यांनी दिली. शिवाय खंडपीठाणे या संदर्भात जि.प. मुख्यकार्यपालन अधिकाऱ्याने या संदर्भात चौकशी करण्याच्या सूचना केल्याची माहिती दिली.(प्रतिनिधी)