पर्यावरण पूरक गणेशोत्सवाबाबत उदासीनताच
By admin | Published: September 1, 2016 02:10 AM2016-09-01T02:10:25+5:302016-09-01T02:10:25+5:30
प्रदूषणाचा मुद्दा जगपातळीवर गाजतोय. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जग धडपडत आहे. या धडपडीला भारतातील अनेक सण, उत्सव फाटा देतात.
चाहुल गणरायाची : प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीची बाजारात भरमार
प्रशांत हेलोंडे वर्धा
प्रदूषणाचा मुद्दा जगपातळीवर गाजतोय. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जग धडपडत आहे. या धडपडीला भारतातील अनेक सण, उत्सव फाटा देतात. यामुळेच येथेही पर्यावरण संवर्धनासाठी मोठी चळवळ सुरू झाली. या चळवळीला बळकटी देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही बाब ओळखूनच ‘मी प्रदूषण करणार नाही’ ही भूमिका घेत जागरुक होणे गरजेचे आहे. हल्ली गणेशोत्सवाच्या रूपात ही संधी मिळाली आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसपासून तयार मूर्ती न वापरता मातीची मूर्ती वापरल्यास पर्यावरण संवर्धन मोहिमेत आपण सहज सहभाग नोंदवू शकतो. ही भावना जागृत होणे अपेक्षित आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी प्रबोधन करता यावे म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. आता या उत्सवाचे रूप मोठे झाले आहे. श्रीगणेश हे महाराष्ट्राचे दैवतच झाले आहे. प्रत्येक घरी गणेशोत्सव साजरा होतो. सार्वजनिक गणेश मंडळेही फक्कड आहेत. घरी लहान गणेशमूर्ती वापरत असले तरी मंडळांकडून मोठ्या मूर्तीची स्थापना केली जाते. यातील बहुतांश मूर्ती अजाणतेपणे प्लास्टर आॅफ पॅरिसच्या आणल्या जातात. या मूर्ती नदी, समुद्रामध्ये विसर्जीत केल्यास त्या पाण्यात विरघळत नाही. वर्षानुवर्षे त्या मूर्ती जैसे थे राहतात. गणेश मूर्तीच्या विसर्जनामुळे पाणी प्रदूषित होते. ८० टक्के रोग या पाण्याच्या वापरामुळे होतात, असा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. यामुळे प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर टाळणेच क्रमप्राप्त आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यास पाण्याचे झरे बंद होतात. मूर्तीला दिलेला रंग आकर्षक दिसावा म्हणून पारा, शिषे यासारखे विषारी रासायनिक घटक वापरतात. यामुळे त्वचेचा रोग, कॅन्सर आदी दुर्धर रोग होतात. जलचर व पाणवणस्पती नष्ट होतात. यामुळे पिओपी टाळणेच गरजेचे आहे.
मूर्ती कशी ओळखायची?
बाजारपेठेमध्ये विक्रीस आलेल्या मूर्तीमध्ये मातीची आणि प्लास्टर आॅफ पॅरीसची मूर्ती ओळखणे अधिक कठीण नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. केवळ मातीची मूर्ती वजनाने जड असतात. शिवाय त्यावरील रंग अधिक चमकदार दिसत नाहीत. याउलट प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती खालून पोकळ, वजनाने हलकी आणि रासायनिक रंगांमुळे आकर्षक दिसतात. यामुळे मातीची मूर्ती ओळखणे अधिक कठीण नसून ती उचलून पाहिल्यास लक्षात येऊ शकते.
का टाळाची पीओपीची मूर्ती?
रासायनिक रंग वापरून आकर्षक मूर्ती निर्माण करण्यासाठी प्लास्टर आॅफ पॅरीसचा वापर केला जातो; पण या मूर्ती पाण्यात वर्षानूवर्षे विरघळत नाही. प्लास्टर आॅफ पॅरीसमुळे नदी पात्रातील नैसर्गिक झरे बंद होतात. परिणामी, पाण्याचे स्त्रोत मृत होतात. शिवाय मूर्तीवरील रासायनिक रंगांमुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. पारा, शिसे यासारखे घातक घटक असलेल्या रंगांचे पाणी वापरल्यास विविध दुर्धर आजार जडण्याची शक्यता असते.
भंगलेल्या मूर्ती पाहून भक्तीही ओसरते तेव्हा...
गणेशोत्सवाच्या काळात भाविक भक्तीभावाने दहा दिवसपर्यंत बाप्पाचे आवाहन केले जाते. हार, फुले, नैवेद्य व पूजा-अर्चा करून भगवंताला आळविले जाते. दहा दिवस भक्तीभावे पूजा केलेल्या गणेशाला दहाव्या दिवशी नदीमध्ये विसर्जीत केले जाते; पण बहुतांश मूर्ती पिओपीपासून तयार केलेल्या असतात. यामुळे त्या कित्येक वर्षे पाण्यात विरघळत नाही. पाणी प्रदूषित होते. नैसर्गिक झरे बंद होतात. नदीपात्र स्वच्छ करताना मग त्या मूर्ती जैसे थे बाहेर काढल्या जातात. या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्या तरी भंगतात. या भग्न मूर्ती पाहून मग, भक्तीभावही ओसरतो. पवनारच्या धाम व पुलगाव येथील वर्धा नदी पात्रातूनही अशा भग्न मूर्ती बाहेर काढल्या. तेव्हा भाविकांचा गहिवर होतो.