उपमुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीची केली पाहणी; पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करण्याचं आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2022 12:32 PM2022-07-19T12:32:23+5:302022-07-19T12:54:41+5:30
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व नुकसानग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या.
नागपूर : राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. विदर्भात आठवडाभरापासून सर्वत्र संततधार पावसामुळे दयनीय स्थिती झालेली आहे. वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असून पुराचे पाणी अनेक गावांत शिरले आहे. पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. १९) वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील वना नदी किनाऱ्यावरील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी हिंगणघाट शहरातील नागरिक, शेतकरी यांच्याशी संवाद साधला पूरग्रस्त भागाची संपूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतली. हिंगणघाट येथील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांची शहरातील जी.बी.एम.एम.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. फडणवीस यांनी याठिकाणी भेट देऊन अतिवृष्टीग्रस्तांशी संवाद साधला. पावसाचा पूर आणि चिखल यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही या भागाची पाहणी केली असून जितकी जास्त मदत करता येईत तितकी मदत करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
📍समुद्रपूर, वर्धा.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 19, 2022
अतिशय कठीण परिस्थितीमध्ये लोकांना वाचविण्याचे काम यंत्रणांनी केले आहे आणि अजूनही ते करीत आहेत.
दुबार पेरणी सुद्धा संकटात आली आहे. शेतकऱ्यांना योग्य मदत राज्य सरकारतर्फे दिली जाईल. माध्यमांशी संवाद...#Wardha#floods#Maharashtra#rescueoperationpic.twitter.com/RNW8VkCvPr
जोरदार पावसामुळे अनेक गावं पाण्याखाली आहेत, अनेक गावांना पुराचा वेढा पडला असून नागरिक पुराच्या पाण्यात अटकून पडले आहेत. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये लोकांना वाचविण्याचे काम यंत्रणांनी केले आहे आणि अजूनही ते करीत आहेत. जोपर्यंत शेवटचा व्यक्ती रेस्क्यू करत नाही तोपर्यंत बचावकार्य सुरु राहणार, असेही त्यांनी सांगितलं.
#वर्धा जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या सततधार पावसामुळे वणा नदीला पुर येऊन शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेत पिकांचे नुकसान व अजूनही तुडूंब भरुन वाहत असलेल्या वणा नदीची पाहणी केली. @Dev_Fadnavis@RamdasTadasMP@MahaDGIPR@InfoVidarbhapic.twitter.com/C4tDTbaqmO
— DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA (@InfoWardha) July 19, 2022
दुबार पेरणीसुद्धा संकटात आली आहे. शेतकऱ्यांना योग्य मदत राज्य सरकारतर्फे दिली जाईल, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांच्या समावेत आमदार समीर कुणावर, खासदार रामदास तडस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार राजू तिमांडे आदी उपस्थित होते.