जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वृद्ध महिलेचा डेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 05:00 AM2022-03-16T05:00:00+5:302022-03-16T05:00:17+5:30
वृद्ध महिला सुलभा पिंगळे यांची नगरपालिका कर्मचारी निखिल लोहवे यांनी विचारपूस केली असता, त्यांनी तीन ते चार व्यक्तींविरुद्ध तक्रार असल्याचे सांगितले. यातील काही केसेस न्यायालयात दाखल असून, काही तक्रारी खोट्या निघाल्या आहेत, असेही लोहवे म्हणाले. या वृद्ध महिलेने ज्या जागेबद्दल तक्रार केली, त्याची पालिकेने तपासणी केली. मात्र, ती तक्रारही खोटी असल्याचे निदर्शनास आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयातील वरच्या माळ्यावर असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच एका वृद्ध महिलेने सकाळीच खाटेसह काही साहित्य घेऊन ठिय्या मांडला. यामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाल्याने पोलीस आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. तेव्हा वृद्ध महिलेची समजून काढून तिला घरी परत पाठविले. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सुलभा पिंगळे असे या वृद्ध महिलेचे नाव असून, तिचे वय जवळपास ८३ ते ८५ वर्षे असल्याचे सांगण्यात आले. ही वृद्ध महिला मंगळवारी सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिल्या माळ्यावरील जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर खाट, अंथरून, पांघरून आणि भोजनाचे साहित्य घेऊन डेरेदाखल झाली होती. सकाळी ९ वाजता कार्यालयातील कर्मचारी आल्यानंतर जिल्हाधिकारी दालनाच्या बाजूला असलेली वृद्ध महिलेची ही राहुटी पाहून चांगलाच धक्का बसला. सर्व कर्मचाऱ्यांनी तिच्या सभोवताली गोळा होऊन विचारपूस केली असता, वृद्धेने तक्रारीचा पाढा वाचायला सुरुवात केली. अखेर काही वेळानंतर नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वृद्ध महिलेची समजूत काढून तिला बाहेर काढले. परंतु एकटी वृद्ध महिला एवढे सर्व साहित्य घेऊन वर कशी आली, तिला याकरिता कोणी मदत केली? असे प्रश्न निर्माण झाल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासला. तेव्हा मंगळवारी सकाळी ही महिला जिल्हाधिकारी कार्यालयात आल्याचे निदर्शनास आले. तिचे सर्व साहित्य एका व्यक्तीने वरपर्यंत पोहोचविल्याचेही दिसले. आता तो व्यक्ती कोण? याचा शोध सुरू आहे. पण या घटनेने या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रार खोटी निघाली
- वृद्ध महिला सुलभा पिंगळे यांची नगरपालिका कर्मचारी निखिल लोहवे यांनी विचारपूस केली असता, त्यांनी तीन ते चार व्यक्तींविरुद्ध तक्रार असल्याचे सांगितले. यातील काही केसेस न्यायालयात दाखल असून, काही तक्रारी खोट्या निघाल्या आहेत, असेही लोहवे म्हणाले. या वृद्ध महिलेने ज्या जागेबद्दल तक्रार केली, त्याची पालिकेने तपासणी केली. मात्र, ती तक्रारही खोटी असल्याचे निदर्शनास आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना विचारले असता, यासंदर्भात काहीच माहिती नसल्याचे सांगितले.