पाच एकरात २० लाखांचे उत्पन्न घेण्याचा ध्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:18 PM2017-10-16T23:18:40+5:302017-10-16T23:18:58+5:30
एकीकडे केळीच्या बागा नावापुरत्याच दिसत असताना पवनार येथील एका युवकाने स्वेच्छानिवृत्ती घेत शेतीत पूर्णत: लक्ष दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : एकीकडे केळीच्या बागा नावापुरत्याच दिसत असताना पवनार येथील एका युवकाने स्वेच्छानिवृत्ती घेत शेतीत पूर्णत: लक्ष दिले. भर उन्हाळ्यात त्याने पाच एकरात केळीची लागवड केली व अवघ्या दोन महिन्यांत त्यापासून उत्पन्नही मिळणार आहे. ५ लाख रुपयांचा खर्च करून २० लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा बाळगणारा हा शेतकरी इतरांकरिता आदर्शच ठरणार आहे.
ग्रामसेवकाची नोकरी करणाºया कुंदन वाघमारे यांनी डिसेंबर २०१५ ला स्वेच्छानिवृत्ती घेतली. पवनार-सुरगाव मार्गावर शेती घेऊन भर उन्हाळ्यात ६ मार्च रोजी पाच एकरात ७ हजार टिशू केळीच्या रोपांची लागवड केली. उन्हाळ्यात केळीची लागवड आपल्या भागात करणारा कदाचित हा पहिलाच शेतकरी असावा. ठिबक सिंचनाच्या साह्याने बैलजोडीचा वापर न करता शेती करण्याचा चंग बांधला. मार्च महिन्यात लागवड आणि आगस्ट महिन्यात फळधारणा झाली. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात केळी विक्रीस बाजारात जाण्यायोग्य झाली असून फेबु्रवारी महिन्यात संपूर्ण बगीचा खाली होण्याची शक्यता आहे. दीड वर्षाचे असलेले केळीचे पीक ११ महिन्यांत मिळणार आहे. एक हजार रुपये क्विंटल भाव धरल्यास सरासरी ३५ किलो याप्रमाणे प्रती केळीच्या झाडापासून ३५० रुपये उत्पन्नाची अपेक्षा आहे. यामुळे पाच एकरातील केळीपासून ५ लाख रुपयांच्या खर्चात २२ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. या केळीच्या बगीच्याला अधिकाºयांसह शेतकºयांनी भेटी दिल्या. हा प्रयोग यशस्वीतेकडे वाटचाल करीत आहे. यामुळे येत्या काळात केळीच्या बागा वाढण्याची शक्यता आहे.
कमी खर्चात अधिक उत्पन्न घेता येते. केळीच्या बागा नामशेष होत असताना एका वर्षात कमी खर्चात अधिक उत्पन्न केळीपासून घेता येऊ शकते, हे आता सिद्ध झाले आहे. शेतकºयांनी पुन्हा केळी पिकाकडे वळल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते.
- कुंदन वाघमारे, शेतकरी, पवनार.