उजाड झालंय शिवार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 06:00 AM2020-03-19T06:00:00+5:302020-03-19T06:00:17+5:30

रबी हंगामातही निसर्ग कोपलेलाच असल्याचे दिसून येत आहे. आठवड्याभरात दुसऱ्यांना अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवरचे पाणी पळाले आहे. मंगळवारी रात्री तास-दीडतास चाललेला विजेचा कडकडाट आणि वादळी पावसाच्या तांडवाने शेतशिवार उजाड झालं आहे. तर कारंजा तालुक्यातील सावल आणि खैरवाडा या परीसरात वीज पडल्याने चार शेतकरी जखमी झाले आहे.

The desolation of Shivar ... | उजाड झालंय शिवार...

उजाड झालंय शिवार...

Next
ठळक मुद्देवीज पडून चौघे जखमी : संत्रा,केळीच्या बागांना फटका, गहू, चण्याचे नुकसान

वर्धा: रबी हंगामातही निसर्ग कोपलेलाच असल्याचे दिसून येत आहे. आठवड्याभरात दुसऱ्यांना अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवरचे पाणी पळाले आहे. मंगळवारी रात्री तास-दीडतास चाललेला विजेचा कडकडाट आणि वादळी पावसाच्या तांडवाने शेतशिवार उजाड झालं आहे. तर कारंजा तालुक्यातील सावल आणि खैरवाडा या परीसरात वीज पडल्याने चार शेतकरी जखमी झाले आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी व कारंजा (घाडगे) या सहा तालुक्यामध्ये या पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. वादळामुळे संत्रा व केळी बागांना मोठा फटका बसला असून गहू व चण्याचीही नासधूस झाली आहे. अनेकांच्या घराचे छत उडाल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य व धान्य भिजल्याने दुसऱ्यांच्या घराचा आधार घ्यावा लागला. वर्धा तालुक्यातही मोठा फटका बसला असून शहरालगतच्या साटोडा, आलोडी परिसरात विद्युत खांब पडले होते. सोबतच वृक्षही कोलमडल्याने रात्रभर विद्युतपुरवठा खंडीत झाला होता. प्रशासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

सेलू परिसरात वादळाचा फटका
सेलू : तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. केळी, गहू, चणा व भाजीपाला या पिकांची नासाडी झाल्याने शेतकºयांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे. सेलूसह घोराड, किन्ही, मोही, हिंगणी, रेहकी, सुरगाव, वडगाव आदी गावातील केळींच्या बागांचे नुकसान झाले. काही शेतकºयांचे केळी खाली पडली तर काहींच्या केळीच्या पानांच्या चिंधड्या झाल्या. गहू व चणा जमिनीवर लोळला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आलेल्या धान्याचे पोते तसेच कापसाच्या गाड्याही ओल्या झाल्या. त्यामुळे सीसीआयची कापूस खरेदी सुरू राहील की नाही या विवंचनेत शेतकरी होते. बाजार समितीचे मनोज पडवे यांनी संबंधितांशी भेटून शेतकºयांची व्यथा सांगून कापूस घेण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.

केळझरमध्ये निसर्गाचा प्रकोप
केळझर: परिसरात मंगळवारच्या रात्री झालेल्या अवकाळी पावसाच्या प्रकोपाने शेतकºयांच्या तोंडघसी आलेला घास हिसकावून नेला आहे. कापणीला आलेला हरभरा, गहू व कापूस यासह फळ भाजी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतात कापणीनंतर लावण्यात आलेल्या गहू व चण्याच्या ढिगात तासभर झालेल्या पावसाचे पाणी शिरल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच आता हे पीक वाळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

देवळी तालुक्यात १३ घरांची पडझड
देवळी : मंगळवारच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. रात्रीला घरातील सर्वजन झोपण्याच्या तयारीत असताना वादळी पावसाने चांगलाच कहर केला. तासभर चाललेल्या या तांडवात घरांसह पिके भूईसपाट केली. देवळी मंडळात १३ घरांची पडझड झाली असून विद्युत खांब व फळबागांचे नुकसान झाले. पुलगाव मंडळात फक्त शेतमालांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पडझड झालेल्या घरांचे तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, महसूल अधिकारी, तलाठी आदींना सांगण्यात आल्याचे नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख यांनी सांगितले. शेतात लावण्यात आलेल्या गव्हाच्या गंजीत पाणी गेल्याने नुकसान झाले आहे.

आकोली परिसरात नुकसान
आकोली: मंगळवारच्या रात्री मेघगर्जनेसह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास तासभर चाललेल्या या पावसाने रबी पिकांना भूईसपाट केले आहे. मळणीला आलेला गहू, चणा या पिकांसह केळीच्या बागांनाही मोठा फटका बसला आहे. मदनी येथील ज्ञानेश्वर गुळघाने व नितीन दिघडे यांच्या शेतातील केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आष्टी तालुक्यात मुसळधार
आष्टी( श.) : मगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाºयासह आलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील घरांची पडझड झाली. तसेच गहू, चणा, कांदा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. वादळाने गहू लोळला असून चण्याच्या ढिगातही पाणी शिरल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागणा आहे. बुधवारी सकाळी सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. वातावरणातील या बदलामुळे शेतकरी धास्तावला आहे.

हिंगणघाटात सात घरांचे छत उडाले
हिंगणघाट: तालुक्यातील वाघोली सर्कलमध्ये मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी चांगलेच थैमान घातले. यात गहू, चणा व कपाशीच्या पिकांसह घरांचे नुकसान झाले आहे. सात घरावरील छत उडाल्याने अंशत: नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. रात्री १२ वाजताच्या दरम्यान सुरु झालेल्या पावसाने दीड तासात चांगलाच दणका दिला. यात हिंगणघाट, वाघोली, किनगाव, कवडघाट येथील घरांचे नुकसान झाले असून वाघोली येथील ६ हेक्टर मधील गव्हाचे नुकसान झाले.

सिंदी परिसराला पावसाने झोडपले
सिंदी (रेल्वे): जवळपास तासभर आलेल्या पावसाने सिंदी परिसराला झोडपून काढले आहे. यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची कंबरडे मोडले आहे. अचानक मध्यरात्री आलेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. परिसरातील गहू व चण्याचे पीक जमिनीवर लोळले. काही शेतकऱ्यांनी चण्याची कापणी करुन ढिग मारुन ठेवला असता त्यावर झाकलेल्या ताडपत्र्या वादळाने उडून गेल्याने चणा ओला झाला आहे. या पावसामुळे तासभर परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

कांदा व भाजीपाल्यांची लागली वाट
रसुलाबाद : मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास रसुलाबाद परिसरात विद्दुलतेसह वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गहू, चणा, कांदा, टरबूज व भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे काहींच्या घरांचेही नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळी सात ते आठ वाजतादरम्यान पुन्हा पावसाने हजेरी लावली होती. रबी हंगामातील पिकेही अवकाळी पावसाने तोंंडचा घास हिरावला आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Web Title: The desolation of Shivar ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.