हिंदी विद्यापीठात साकारणार भारतीय भाषांमध्ये कायदा शिक्षणाचे जागतिक केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 01:45 PM2022-05-21T13:45:48+5:302022-05-21T17:21:11+5:30
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची अंमलबजावणी करणाऱ्या आघाडीच्या विद्यापीठांपैकी एक आहे.
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अनुरूप मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला असून, प्रथमत: हिंदीमध्ये आणि येत्या काही वर्षांत राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या इतर भारतीय भाषांमध्ये कायद्याचे शिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन करण्याचा संकल्प केला आहे.
वकिली कलेत निष्णात वकील आणि न्याय देण्यास सक्षम न्यायाधीश तयार करणे, हे या केंद्राचे काम असेल. हे व्यापक उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने सत्र २०२१ - २०२२पासून हिंदी भाषेत बीएएलएलबी (ऑनर्स) कार्यक्रम सुरू केला आहे. येत्या काही वर्षांत बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या परवानगीने विद्यापीठ इतर भारतीय भाषांमध्ये कायद्याचे शिक्षण देण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करत आहे. सुरुवातीला मराठी, गुजराती, तेलगू आणि बंगाली भाषांमध्ये बीएएलएलबी (ऑनर्स) कार्यक्रम सुरू करण्याची विद्यापीठाची योजना आहे.
हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या विधी विद्यापीठांतर्गत चालवला जातो. विधी विद्यापीठाच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांमध्ये प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदा शिक्षण सुरू करणे समाविष्ट आहे. महत्त्वाची बाब म्हणजे न्याय मिळवणाऱ्याचे समाधान आणि त्याला त्याच्या भाषेत न्याय मिळावा, हा यामागचा हेतू आहे. न्याय वितरण व्यवस्था स्वीकारार्ह बनवण्यासाठी राजभाषा हिंदीसह अन्य भारतीय भाषांमध्येही ती प्रदान करणे आवश्यक आहे.
हे सर्वमान्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वप्रथम हिंदीसह भारतीय भाषांमध्ये पारंगत असे वकील आणि न्यायाधीश तयार करण्याची गरज आहे. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये राजभाषा हिंदीसह नमूद केलेल्या सर्व भारतीय भाषांमध्ये कायद्याचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने सत्र २०२१ - २०२२ पासून बीएएलएलबी (ऑनर्स) (पंचवार्षिक) कार्यक्रम सुरू केला आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे शैक्षणिक सत्र २०२२पासून कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) आयोजित केली जात आहे. ज्यामध्ये उच्च शिक्षणाच्या विविध कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाते. यासाठी विद्यापीठांच्या विविध कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी एकूण ६० विषयांसाठी १३ भाषांमध्ये प्रवेश परीक्षा घेतली जात आहेत. पदवीपूर्व कार्यक्रमाच्या या विषयांमध्ये ३३ भाषांसंबधी विषय आणि २७ गैर-भाषिक विषयांचा समावेश आहे. या प्रवेश परीक्षेमध्ये महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धाद्वारे आयोजित केलेल्या पदव्युत्तर कार्यक्रमात एकूण ३७ विषयांचा समावेश आहे. प्रवेश परीक्षेला बसून उमेदवार पदवी कार्यक्रमात प्रवेश मिळवू शकतात. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची अंमलबजावणी करणाऱ्या आघाडीच्या विद्यापीठांपैकी एक आहे हे विशेष.
असा मिळणार येथे प्रवेश
प्रवेश परीक्षेला बसलेले उमेदवार ९ परीक्षणामध्ये (जास्तीत जास्त तीन भाषासंबंधी विषय आणि सहा विषय - विशिष्ट किंवा गैर भाषेचे) असू शकतात. प्रवेश परीक्षेनंतर, NTA उमेदवारांना स्कोअरकार्ड जारी केले जाईल, त्या आधारावर उमेदवार अर्ज करताना निवडलेल्या विद्यापीठात परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश घेऊ शकतील.