समाजाच्या विकासात स्वत:चे स्थान निश्चित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:22 AM2018-01-01T00:22:14+5:302018-01-01T00:22:24+5:30
प्रत्येक विद्यार्थ्याने साने गुरूजींप्रमाणे सहृदयी, गुणवान, शीलवान व व्यासंगी व्हावे. गुरूजींना अभिप्रेत समाजाची निर्मिती करण्यासाठी पवित्र हेतुने कार्यरत रहावे, स्व-विकास साधतांना सुदृढ समाजाच्या विकासातील आपले स्थान निश्चित करावे, असे आवाहन ग्रामगीताचार्य व संस्था संचालक गंगाधर जगताप यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रत्येक विद्यार्थ्याने साने गुरूजींप्रमाणे सहृदयी, गुणवान, शीलवान व व्यासंगी व्हावे. गुरूजींना अभिप्रेत समाजाची निर्मिती करण्यासाठी पवित्र हेतुने कार्यरत रहावे, स्व-विकास साधतांना सुदृढ समाजाच्या विकासातील आपले स्थान निश्चित करावे, असे आवाहन ग्रामगीताचार्य व संस्था संचालक गंगाधर जगताप यांनी केले.
साने गुरूजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वडद येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी वडद येथील सरपंच रमा भगत, शिरसागाव सरपंच योगिता उईके, पालोतीचे उपसरपंच रवी राऊत, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुनिल लोणकर, प्राचार्य सतीश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य सतीश जगताप म्हणाले, ‘शिवबा तुम्ही पुन्हा जन्माला या’ असे म्हणण्याची वेळ आमच्यावर येवु नये. आता आपल्यातून शिवबा, बाबासाहेब आंबेडकर, साने गुरूजी, अब्दुल कलाम निर्माण व्हावेत. समाजाची गरज पूर्ण करण्याची ताकद ही फक्त विद्यार्थ्यांत असते. ही जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारावी असे सांगितले. रवी राऊत यांनी मार्गदर्शन केले. या समारोहात शाळेत कथाकथन, प्रश्नमंजुषा, वर्ग सजावट, वत्कृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविले. संचालन प्रा. सारिका डफरे तर आभार प्रदर्शन विठ्ठल महल्ले यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, पालक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘खरा तो एकची धर्म’ या गीताने समारोप केला.