पुलगावातील बुद्ध विद्याविहाराचा विकास करा
By admin | Published: February 2, 2017 12:47 AM2017-02-02T00:47:10+5:302017-02-02T00:47:10+5:30
पुलगावातील बुद्ध विद्याविहाराला एैतिहासिक वारसा असून या बुद्ध विद्याविहाराच्या विकासासाठी भरीव निधी
रिपाई(ग.)चे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
वर्धा : पुलगावातील बुद्ध विद्याविहाराला एैतिहासिक वारसा असून या बुद्ध विद्याविहाराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून त्याचा विकास करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया (गवईगट) यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. आहे.
निवेदनातून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्म शताब्दीनिमित्ताने शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून अनेक लोकहितार्थ योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव शहरात २५ एप्रिल १९५४ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध विद्याविहाराची कोनशिला ठेवली होती. ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. सदर बुद्ध विद्याविहारात मुलभूत सुविधासह सौदर्यीकरण तसेच तरुण पिढीला मार्गदर्शक ठरणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रकाशित झालेले २२ खंड, संपूर्ण ग्रंथ, साहित्य, पुस्तके ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यापूर्वी या बुद्ध विद्याविहाराचे भूमीपूजन केले होते. हा इतिहास आहे. परिणामी, शासनाने ६० ते ७० लाखाचा निधी उपलब्ध करून देत या बुद्ध विद्याविहाराचा विकास करून त्याला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा प्रदान करावा, अशी मागणीही निवेदनतून करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले. यावेळी जिल्हा अध्यक्ष अॅड. नरेंद पाटील, रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गोकूल पांडे, नंदकुमार बोरकर, आर. टी. हिवरे यांच्यासह रिपाईचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)