श्रमदानातून साधणार ५१ गावांचा विकास
By admin | Published: April 9, 2017 12:30 AM2017-04-09T00:30:59+5:302017-04-09T00:30:59+5:30
श्रमदानातून गावाचा विकास कार्यक्रम आर्वी तालुक्यातील ५१ गावांत घेण्यात येणार आहे.
वर्धा : श्रमदानातून गावाचा विकास कार्यक्रम आर्वी तालुक्यातील ५१ गावांत घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ४५ ते ५० दिवस चालणार आहे. श्रमदानातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावांना सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्यावतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, आर्वीचे उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद प्रवार, महिला बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम. मेसरे, पंचायतचे जाधव, पाणी पुरवठाचे मेश्राम, लघुसिंचनचे कार्यकारी अभियंता एच.पी. गहलोत तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांनी सहभाग घेऊन श्रमदान केले. शनिवारी रसुलाबाद, काकडदरा, विरूळ माळेगाव, पिंपळखुटा, नेरी मिर्झापूर व सावंगी या गावांत श्रमदानातून गावतलाव खोलीकरणाला प्रारंभ करण्यात आला.
यात ग्रामस्थांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. या अभियानाचे समन्वयक म्हणून पाणी फाउंडेशने भूषण कडू व मंदार देशपांडे काम पाहत आहेत.(स्थानिक प्रतिनिधी)