केळझरात विकास कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 10:18 PM2018-02-22T22:18:38+5:302018-02-22T22:18:54+5:30
विदर्भाचा सिद्धीविनायक असलेल्या केळझर नगरीत सध्या शासनाच्या विविध योजनातून विकास कामे अतिशय वेगाने सुरू आहे. राज्याचे मु्ख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केळझर गाव दत्तक घेतले असल्याने येथील गणेश मंदिर, धम्मभूमी व दर्गाह परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू करण्यात आले आहे.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : विदर्भाचा सिद्धीविनायक असलेल्या केळझर नगरीत सध्या शासनाच्या विविध योजनातून विकास कामे अतिशय वेगाने सुरू आहे. राज्याचे मु्ख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केळझर गाव दत्तक घेतले असल्याने येथील गणेश मंदिर, धम्मभूमी व दर्गाह परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू करण्यात आले आहे. सोमवारी आ. डॉ. पंकज भोयर यांनी पीरबाबा दर्गाह परिसरातील विकास कामांना भेट देवून कामांचा आढावा घेतला.
केळझर जवळून समृद्धी महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग जात आहे. त्यामुळे मध्य भारतातील हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून पुढे प्रकाशझोतात येणार आहे. येथे हिंदु धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले गणपती मंदिर व बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेली धम्मभूमी तसेच हिंदु मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पीरबाबा दर्गाह हे तीनही क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विकास विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.
केळझर येथील हजरत पिरबाबा दर्गासाठी १ कोटी ४२ लाख रुपये, बौद्ध विहाराच्या विकासासाठी १ कोटी ३७ लाख तर प्रसिद्ध गणपती मंदिराच्या विकासासाठी १ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय केळझर गावात पर्यटन क्षेत्रासाठी लागणाºया पायाभूत सुविधाही निर्माण केल्या जात आहे. पाच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या गावाला भेट देत विकास कामांची माहिती घेतली होती. त्यानंतर येथील गावातील रस्ते कामांना वेग आला. पीरबाबा दर्गाह परिसरात रस्ता सपाटीकरणाचे काम सुरू असून या रस्त्यालगत दोन्ही बाजूला नालीचे खोदकाम करण्यात येत आहे. तसेच दर्गाच्या प्रवेश द्वाराजवळ पाणी जमा होण्यासाठी एक छोटे टाकेही बांधले जात आहे. या कामाची पाहणी करीत आ. डॉ. भोयर यांनी दर्जाबाबत सुचना केल्या. यावेळी दर्गा कमिटीचे अध्यक्ष डॉ. इर्शाद शेख यांनी भोयर यांचे स्वागत केले. यावेळी जि.प. सदस्य विनोद लाखे, नवशाद शेख उपस्थित होते.
मुख्यमंत्री दत्तक ग्राममुळे निधीची चणचण नाही
केळझर गाव मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले आहे. यामुळे गावांत विकास कामे जोरात सुरू आहेत. गावातील पाणी पुरवठ्यासह रस्ते, नाल्या चकाचक करण्यात येत आहेत. ग्रामपंचायतीच्यावतीनेही कामे करताना कुठलीही कसर सोडली जात नाही. या गावात होत असलेल्या कामांना कुठलाही निधी कमी पडणार नाही याची दक्षता शासनाच्यावतीने घेण्यात येत असल्याचे दिसते.