ग्रामस्थांनी तयार केला विकास आराखडा

By admin | Published: May 27, 2015 01:56 AM2015-05-27T01:56:21+5:302015-05-27T01:56:21+5:30

खासदार आदर्श ग्राम योजनेसाठी निवड झालेल्या तरोडा येथील नागरिकांनी ग्रा.पं. च्या नेतृत्वात प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले.

Development Plan prepared by the villagers | ग्रामस्थांनी तयार केला विकास आराखडा

ग्रामस्थांनी तयार केला विकास आराखडा

Next

वर्धा : खासदार आदर्श ग्राम योजनेसाठी निवड झालेल्या तरोडा येथील नागरिकांनी ग्रा.पं. च्या नेतृत्वात प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले. शिवाय विविध योजनांचा समावेश असलेला विकास आराखडाही तयार केला. यातील लोककल्याणकारी विकास कामांचा शासनाने स्वीकार केल्यास गावाचा विकास वेगाने साध्य होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
तरोड्याची लोकसंख्या तीन हजार ९६५ इतकी आहे. अकरा सदस्य असलेल्या ग्रा.पं. चे नेतृत्व सुनीता टिकले करतात. खासदार आदर्श ग्राम योजनेसाठी तरोड्याची निवड झाल्यानंतर ग्रामस्थांसोबतच पदाधिकाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला होता. या योजनेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी येणार आहे; पण या निधीचा वापर गावातील कोणत्या योजनांसाठी खर्च करायचा यावर ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी चर्चा सुरू केली. या चर्चेतूनच सुमारे ३५ विकासकामे पूढे आली. यातील काही योजनांना प्रशासनाने तत्वत: मान्यता दिली तर काही योजना प्रशासकीय स्तरावर विचाराधीन आहेत. या सर्व योजना ग्रा.पं. अंतर्गत पूर्ण करण्याच्या दृष्टीने पदाधिकारी पाठपुरावा करीत आहे.
गावात वाटर कुल यंत्र बसवावे, पोलीस चौकी उभारून कायदा व सुव्यवस्था राखावी, राष्ट्रसंत तुकडोजी प्रार्थना मंदिर उभारावे, ग्रा.पं. हद्दीत २० दुकानांचे गाळे उभारावे, शेत सर्व्हे क्र. एक मधील जागा गावठानकरिता द्यावी, शेत सर्व्हे क्र. १८० व १९७ मधील जागा ग्रा.पं. च्या ताब्यात द्यावी, धाम प्रकल्पांतर्गत पाटचाऱ्यांची दुरूस्ती करावी, तरोडा परिसरात येत असलेल्या मुख्य कालव्याचे बांधकाम करावे, क्रीडा संकुलाचे बांधकाम करण्यास परवानगी द्यावी, गावात धर्मार्थ रुग्णालय उभारावे, गं्रथालयाची निर्मिती करून वाचन संस्कृतीचा विकास करावा, आरोग्य केंद्राला श्रेणी एकचा दर्जा द्यावा, तलाठी कार्यालय, ग्रामदूत व कृषी कार्यालयाच्या बांधकामास निधी द्यावा, जिल्हा परिषदेकडून पारधी वस्तीला विद्युत दिव्यांची व्यवस्था करावी, शेत सर्व्हे क्र. ६०४ मध्ये घुबडटोली परिसरातील अतिक्रमण धारकांना जमिनीचे नियमित पट्टे द्यावे, १९९५ पासून रहिवासी असलेल्या नागरिकांना गावठानमधून जमीन उपलब्ध करून द्यावी आदी ३५ कामांचा आराखडा ग्रा.पं. ने तयार केला. शासनाने यातील काही कामांची दखल घेतली; पण गाव विकासाच्या दृष्टीने सर्वच योजनांचा प्रशासनाने स्वीकार करावा, अशी अपेक्षा सरपंच सुनीता टिकले यांनी व्यक्त केले. खा. रामदास तडस यांच्याकडेही हा आराखडा पाठविला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
काल, आज आणि उद्याचीही नोंद
ग्रामपंचायतीने तयार केलेल्या विकास आरखड्यात काल, आज आणि उद्याचीही नोंद घेण्यात आली. आतापर्यंत किती योजना गावात आल्या, त्याचे लाभार्थी कोण आहेत, किती नागरिक योजनेपासून वंचित राहिले, याची माहिती समाविष्ट करण्यात आली. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कृषी, पशुसंवर्धन, व्यक्तीगत लाभाच्या योजना, सांस्कृतिक परिणाम, सहकार, क्षेत्रातील प्रगती, वृक्ष लागवड, सार्वजनिक स्वच्छता, दलित वस्ती सुधार योजना, गावाचे भौगोलिक क्षेत्र, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे सध्याचे राहणीमान याची वस्तुनिष्ठ नोंद आराखड्यात समाविष्ट आहे. प्रशासनाने या नोंदीची दखल घेत योजनांची अंमलबजावणी केल्यास तरोड्याचे चित्र निश्चितच बदलू शकते, असे मत ग्रामस्थ व्यक्त करतात.

Web Title: Development Plan prepared by the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.