खादीच्या उत्पादनांना चालना देण्याच्या माध्यमातून गांधी फॉर टुमारो प्रकल्पाअंतर्गत सेवाग्राम आश्रमाचा विकास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 06:50 PM2017-10-02T18:50:14+5:302017-10-02T18:50:40+5:30
खादीच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. खादीच्या निर्मित्तीत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्यात खादी उत्पादनाचा आराखडा तयार करून राज्य खादी बोर्डाच्या माध्यमातून राबविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सेवाग्राम आश्रम परिसरात दिली.
वर्धा: खादीच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. खादीच्या निर्मित्तीत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्यात खादी उत्पादनाचा आराखडा तयार करून राज्य खादी बोर्डाच्या माध्यमातून राबविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सेवाग्राम आश्रम परिसरात दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गांधी जयंती दिनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. बापू कुटी येथे सामुदायिक प्राथनेत सहभागी झाले. तसेच चरख्यावर सूत कातून गांधीजींना विनम्र अभिवादन केले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच जल स्त्रोत व नदी विकास मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते, राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत मठकर, सचिव डॉ. श्रीराम जाधव, ज्येष्ठ गांधीवादी मा. म. गडकरी, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी यावेळी उपस्थित होते.
खादीची मागणी वाढत असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यामध्ये खादी उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची विनंती सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्र्यांना यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खादी उत्पादनाच्या माध्यमातून युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. रोजगारासाठी खादीचे सुलभ तंत्रज्ञान तसेच खादी पर्यावरणपूरक असल्यामुळे राज्य खादी ग्राम उद्योग तसेच राज्यातील खादी ग्रामोद्योग संस्थांची बैठक घेण्यात येईल, त्यानंतर उत्पादनाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणा-या सामान्य कार्यकर्त्यासाठी प्रशिक्षण देण्याची सुविधा आश्रम प्रतिष्ठानतर्फे करण्यात येईल तसेच सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत आश्रम परिसराचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
बचत गटाच्या उत्पादनांना प्रोत्साहन
अभियानाअंतर्गंत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे तयार करण्यात आलेल्या ट्रेडल पंप तसेच पशुखाद्यासह विविध उत्पादनांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. ट्रेडल पंपाच्या माध्यमातून विजेशिवाय परसबाग, फूल शेती तसेच छोट्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना या पंपाचा लाभ देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना केली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे सेवाग्राम आश्रम परिसरात बचत गटाच्या उत्पादनाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेतली तसेच महिला बचत गटाकडून उत्पादित होणाऱ्या उत्पादनाना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. उमेद या संस्थेतर्फे बचत गटाच्या उत्पादनाचे प्रदर्शन यावेळी लावण्यात आले होते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने यांनी बचत गटाच्या उत्पादनाची माहिती दिली.