गावांच्या विकासाकरिता ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:37 PM2018-10-11T22:37:40+5:302018-10-11T22:37:57+5:30
जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासाची गंगोत्री आहे. ग्रामीण भागाच्या विकासाकरिता विविध योजनांच्या माध्यमातून निधी पुरविला जातो. परंतु ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव राहत असल्याने विकासाला खिळ बसते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासाची गंगोत्री आहे. ग्रामीण भागाच्या विकासाकरिता विविध योजनांच्या माध्यमातून निधी पुरविला जातो. परंतु ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव राहत असल्याने विकासाला खिळ बसते. परिणामी ग्रामीण जनतेमधून नाराजीचा सूर उमटतो. त्यामुळे पंचायत समितीवरील अधिकारी, पदाधिकारी आणि नागरीक यांच्यामध्ये समन्वय घडवून विकास साधण्याकरिता आता जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाची सुरुवात उद्या १२ आॅक्टोबर रोजी कारंजा पंचायत समितीतून होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांमार्फत ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शासनाव्दारे पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील तळागाळातील लोकांच्या विकासाच्या विविध योजनांची माहिती देणे. पंचायत राज व्यवस्थेमध्ये जनतेला योग्य तो न्याय व विकास विषयक कामे पूर्णत्वास नेण्याकरिता येणाºया अडचणींचे निराकरण करणे तसेच नियोजनाअभावी विकास कामे पुर्णत्वास जात नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये व्यक्त होणारी नाराजी दूर करण्यासाठी त्यांचे समाधान करणे. पंचायत समिती स्तरावर पदाधिकारी व अधिकारी यांच्यात समन्वय साधून विकास कामांना गती देत असताना त्यावर उपाययोजना सूचविणे. गाव पातळीवर काम करीत असताना सरपंच व ग्रामसेवक यांना येणाºया अडचणी जाणून घेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे पत्रकातून कळविण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेतील समित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व खातेप्रमुख यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. असा उपक्रम राबविणारी राज्यातील ही पहिली जिल्हा परिषद आहे.
नितीन मडावी, अध्यक्ष, जिल्हा परिषद, वर्धा