देवळीची पाणीपुरवठा योजना अजूनही अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 09:58 PM2019-05-10T21:58:05+5:302019-05-10T21:58:47+5:30
शहराला पाणीपुरवठा करणारी ३४ कोटी खर्चाची महत्त्वाकांक्षी योजना मागील सहा वर्षांपासून पूर्णत्वास जात नसल्याने खासदार रामदास तडस यांनी नाराजी व्यक्त केली. आर.जी. सानप कन्स्ट्रक्शन नांदेड या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी खासदार तडस यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : शहराला पाणीपुरवठा करणारी ३४ कोटी खर्चाची महत्त्वाकांक्षी योजना मागील सहा वर्षांपासून पूर्णत्वास जात नसल्याने खासदार रामदास तडस यांनी नाराजी व्यक्त केली. आर.जी. सानप कन्स्ट्रक्शन नांदेड या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी खासदार तडस यांनी केली. जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता या सर्व प्रकाराला कारणीभूत असल्याने त्यांना वेळीच सुधारण्याचा दम देण्यात आला. अंदोरी येथील वर्धा नदीवरून देवळी शहराला पाणी पुरवठा करणाºया योजनेला भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना खासदार तडस बोलत होते.
कडक उन्हाळ्याच्या दिवसात देवळीत पाणीबाणी असून कधी दिवसाआड तर कधी दर दोन दिवसांनी नागरिकांना पाणीपुरवठा होत आहे. सार्वजनिक विहिरी पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहे. विंधन विहिरींचे पाणी खोल गेल्याने त्या सुद्धा अखेरच्या घटका मोजत आहे. अशा परिस्थितीत शहरात पाणी पुरवठा करणाºया ३४ कोटी खर्चाच्या योजनेचे काम पुढे जात नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. या योजनेत समाविष्ट असलेली काही महत्वाची कामे गेल्या सहा वर्षांपासून थंडबस्त्यात आहे.
अंदोरी गावातून वर्धा नदी पात्रातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीपर्यंत रस्त्याचे बांधकाम न केल्याने पावसाळ्याचे दिवसात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी पुरवठ्याचे ठिकाणी एक्सप्रेस फीडर बसविले नसल्याने कधीकाळी लाईन गेल्यानंतर संपूर्ण पाणी पुरवठा ठप्प पडत आहे. शहरातील मधुसूदन ले आऊट येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. परंतु ले आऊट मध्ये पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन टाकण्यात न आल्याने तसेच या परिसरातील चार पदरी रस्त्याचे बांधकाम ही पाईपलाईनच्या कामात अडकल्याने अडचण निर्माण झाली आहे. शहरातील ले आऊटमध्ये जलवाहिनी टाकण्यात आली. परंतु जीवन प्राधिकरणाने वर्षभरापासून घरगुती नळजोडणी न दिल्याने येथील नागरिक पाण्यापासून वंचित आहे. शहरातील अंतर्गत पाईप लाईन अजून टाकावयाची आहे.
ठरलेल्या अटीनुसार योजनेचे काम सन २०१५ पर्यंत पूर्णत्वास न्यावयाचे होते. मात्र या कालावधीत काम पूर्ण न झाल्यामुळे योजनेला सन २०१८ पर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. असे असले तरी अद्यापही योजनेचे बहुतांश काम थंडबस्त्यात आहे. योजनेनुसार प्रत्येक घरी वॉटर मीटर बसवून २४ तास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन होते. परंतु योजनेचा संबंधीत ठेकेदार व जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या नियोजन शून्यतेमुळे ही योजना शेवटच्या टप्प्यात रखडली आहे. योजनेला वेळ झाल्याने यावरचा खर्च सुद्धा वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. निधीची व्यवस्था करतो पण कामात कुचराई चालणार नाही असा दम खासदार तडस यांनी अधिकाºयांना दिला. यावेळी नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, सभापती नंदु वैद्य, उपविभागीय अभियंता मदनकर, अंकुश जाधव, उल्हास राठोड आदी उपस्थित होते.
अठरा कोटींची गरज दीड कोटीच मिळाले
निधीची अडचणी असल्याने योजनेचे काम खोळंबले असल्याचे जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक वाघ यांनी सांगितले. यासाठी ३ कोटीची मागणी केली असता फक्त दीड कोटी देण्यात आले.
ही योजना पूर्णत्वास आणण्यासाठी अजून १८ कोटीची आवश्यकता असल्याचे एकट्या एक्स्प्रेस फीडरचा खर्च दीड कोटीच्या घरात असल्याने कार्यकारी अभियंता वाघ यांनी खासदार तडस यांना सांगितले.