‘धाम’च्या पाण्याची गळती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 06:00 AM2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:00:05+5:30
जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहराची पाणी समस्या निकाली निधावी या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन आर्वी तालुक्यातील धाम नदीवर महाकाळी येथे धाम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाचे बांधकाम १९७५ मध्ये पूर्ण झाले. तर घळभरणीचे काम १९८६ मध्ये करण्यात आले. शिवाय १९८७ पासून सिंचनास सुरूवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाकाळी येथील धाम प्रकल्प वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील नागरिकांच्या तृष्णातृप्तीसाठी उपयुक्त ठरणारा आहे. परंतु, याच प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे येळाकेळी येथील धाम उन्नई बंधाºयातून वाहून जात आहे. त्यामुळे यंदाही उन्हाळ्यात वर्धावासीयांना जल संकटाला तोड द्यावे लागेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहराची पाणी समस्या निकाली निधावी या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन आर्वी तालुक्यातील धाम नदीवर महाकाळी येथे धाम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाचे बांधकाम १९७५ मध्ये पूर्ण झाले. तर घळभरणीचे काम १९८६ मध्ये करण्यात आले. शिवाय १९८७ पासून सिंचनास सुरूवात झाली. वेळोवेळी काम हाती घेऊन वितरण प्रणालीचे काम पूर्ण करण्यात आल्याने सुमारे ९५ हजार हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. शिवाय धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाणी येळाकेळी येथील धाम उन्नई बंधारा येथे अडविले जाते. तेथून वर्धा नगर परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण धामच्या पाण्याची उचल करते. परंतु, याच बंधाऱ्याच्या दुरूस्तीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने सध्या बंधाऱ्यातून पाण्याची गळती होत आहे. सुमारे एक वर्षांपासून ही परिस्थिती जैसे थेच असल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्वयंचलित बोडबोल गेटचे रबर सील बदलविण्याकडे दुर्लक्ष
येळाकेळी येथील धाम उन्नई बंधाऱ्याची उंची नदी तळापासून ८.६० मीटर तर लांबी ११८.५० मीटर आहे. बंधाºयामध्ये १६ स्वयंचलित गोडबोल गेट बसविण्यात आले आहे. या बंधाऱ्यातून बिगर सिंचनासाठी पाणी वापर केले जाते. प्रत्येक चार वर्षांनंतर गेटचे रबर सील बदलविणे गरजेचे होते. परंतु, यांत्रिकी विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, रबर सील व्यवस्थित नसल्याने सध्या या बंधाऱ्यातून पाणी वाहून जात आहे.
आठ लाखांचा निधी; पण काम शून्य
येळाकेळी येथील धाम उन्नई बंधाराच्या दुरुस्तीसाठी तब्बल आठ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. परंतु, यांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित धोरणाचा अवलंब केल्या जात आहे. बंधाऱ्यातून सुरू असलेली पाणी गळती वेळीच दुरूस्तीचे काम हाती घेऊन थांबविली नाही तर यंदाही नागरिकांना जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.
पत्रव्यवहारांकडे कानाडोळा
धाम उन्नई बंधाऱ्यातून धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी वाहून जात असल्याने दुरुस्तीबाबत वर्धा पाटबंधारे विभागाकडून यांत्रिकी विभागाकडे पत्र व्यवहार करण्यात आले; पण त्या पत्रांनाही केराची टापली दाखविली जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यंदा या प्रकरणी काय करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. नागपूर यांत्रिकी विभागाची बाजू जाणून घेण्यासाठी अधीक्षक अभियंता आत्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.