धनगर जमातीला एस.टी. प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 04:58 PM2024-09-24T16:58:01+5:302024-09-24T17:01:14+5:30
वर्धा येथे अन्नत्याग आंदोलन : हिंगणघाट येथे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : धनगर जमातीला एस.टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी पंढरपूर, लातूर, नेवासा येथे ९ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र याची शासनाने दखल घेतली नाही. या उपोषणाला पाठिंबा म्हणून वर्धा येथे धनगर समाजबांधवांच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात आले तर हिंगणघाट येथे तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्रात धनगर जमात पिढ्यानपिढ्या मेंढपाळाचा व्यवसाय करीत आहे. १९५६ च्या अनु, जमातीच्या यादीत अनु, क्रमांक ३६ वर केवळ इंग्रजी मराठीच्या चुकीमुळे धनगर ऐवजी धनगड असे लिहिले गेले. धनगड नावाची जमात देशातच काय तर जगात कुठेच अस्तित्वात नाही. त्यामुळे ६८ वर्षांपासून धनगर समाज संविधानिक अधिकारापासून वंचित आहे. धनगड जमात राज्यात अस्तित्वात नाही, असे महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा लेखी स्वरूपात कळविले आहे. असे असले तरी अद्यापही शासनाने यात सुधारणा केली नाही. त्यामुळे अनु, जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर असलेली जमात धनगड नसून धनगर आहे हे असे स्पष्ट करीत, महाराष्ट्र शासनाने तात्काळ निर्णय घेऊन धनगर जमातीला एस.टी.चे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच पंढरपूर, नेवासा, लातूर येथे धनगर जमातीला एस.टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. हे आंदोलन धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने स्थानिक लोकमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात करण्यात आले.
यावेळी वासुदेव राऊत, एस.जी. महाजन, गुणवंत बगाडे, सुनील धवते, गजेंद्र कापडे, किशोर ढवळे, राहुल ढगे, व्ही. व्ही. पातोंड, निलेश उघडे, चंदू शिंदे, डॉ. पंडित थोटे व अन्य उपस्थित होते. यावेळी आंदोलनाला राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) चे समीर देशमुख, काँग्रेसचे सुधीर पांगुळ, डॉ. अभ्युदय मेघे यांनी भेट देत प्रश्न जाणून घेतले.
हिंगणघाट येथूनही आंदोलनाला पाठिंबा
गत १४ दिवसांपासून सुरु असलेल्या पंढरपूर, लातूर, नेवासा येथील धनगर आरक्षण अंमलबजावणी आंदोलनाला हिंगणघाट लोकमाता अहिल्यादेवी होळकर समाज जागृती मंडळ व धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने पाठिंबा दिला. आरक्षण अंमलबजावणीवर तातडीने कारवार्ड करावी, अशी मागणी तहसीलदार शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गणेश उगे, उपाध्यक्ष यादव तुराळे, सचिव दिलीप बोभाटे, सहसचिव वासुदेवराव पडवे, कोषाध्यक्ष दादाजी नन्नुरे, डॉ. संदीप लोंढे, कृष्णा शेंडगे, सुधीर तिनघसे, हेमराज हुलके, भारत लोंढे, रमेश घोडे, देविदास ढोकणे, रामराव मेहत्री, विजय उगे, छत्रपती रोकडे, सुहास शिरपूरकर, कवडू शेळके, हरिश्चंद्र डोले, प्रशांत दवंडे, अरविंद मुंगल, बंडू लोंढे, रमेश उगे, विठ्ठल तुरके, महेंद्र पडवे, वसंतराव डोले, मधुकर भोयर, डॉ. दिगंबर येडे, संजय तुराळे, पंकज धवणे, अभिषेक उगे, स्नेहल चिडे, गौरव घोडे, धनराज टापरे, शुभम उगे, अभिमान चाहणंदकर, एस.बी. कापरे, यांची उपस्थिती होती.