धोची घाट रद्दची फाईल पेंडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:40 PM2019-08-19T23:40:35+5:302019-08-19T23:41:27+5:30

समुद्रपूर तालुक्यातील शिवणी आणि हिंगणघाट तालुक्यातील धोची हे दोन्ही वाळू घाट वादाच्या भोवऱ्यात सापडले. शिवणी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर पिस्टल रोखल्याच्या कारणावरुन तो घाट तत्काळ रद्द केला. पण, धोची घाटावर चाकूहल्ला झाल्यानंतरही घाट रद्दची कारवाई झाली नाही.

Dhochi Ghat canceled file pending | धोची घाट रद्दची फाईल पेंडिंग

धोची घाट रद्दची फाईल पेंडिंग

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनाचा कारवाईत भेदभाव : वाळू उपशाला मूकसंमती?

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील शिवणी आणि हिंगणघाट तालुक्यातील धोची हे दोन्ही वाळू घाट वादाच्या भोवऱ्यात सापडले. शिवणी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर पिस्टल रोखल्याच्या कारणावरुन तो घाट तत्काळ रद्द केला. पण, धोची घाटावर चाकूहल्ला झाल्यानंतरही घाट रद्दची कारवाई झाली नाही. आता घटनेला महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही आदेशाची फाईल जिल्हाधिकारी कार्यालयातच पेंडींग आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कारवाईत असा भेदभाव करण्याचे कारण तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी पहिल्या टप्प्यात दहा घाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यातील आठ घाटांचा लिलाव झाला असून त्यामध्ये आष्टी तालुक्यातील ईस्माईलपूर, हिंगणघाट तालुक्यातील सोनेगाव (रिठ), नांदगाव (बोरगाव)-२, पारडी (नगाजी), धोची व समुद्रपूर तालुक्यातील शिवणी-१, शिवणी-२ व मांडगाव या वाळू घाटांचा समावेश आहे.
यापैकी ईस्माईलपूर व धोची घाट वगळता सर्व घाटांची मुदत जूलै महिन्यातच संपली. यातील इस्माईलपूर घाटाचा ताबा उशिरा घेण्यात आल्याने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत तर धोची घाट आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीने सर्वाधिक २ कोटी ३५ लाख ५० हजार रुपयाच्या ऐतिहासिक बोलीत घेतल्याने या घाटाधारकाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु, धोची घाटासह शिवणी-१ घाट हा माफीयागिरीमुळे मुदत संपण्यापूर्वीच कारवाईच्या कचाट्यात सापडला. शिवणी घाटात संतोष नवरंगे नामक वाळू माफियाने हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या ताफ्यावर पिस्टल रोखल्यामुळे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करीत आठ दिवसाच्या आत हा घाट रद्द करण्याचा आदेश पारीत झाला. पण, धोची घाट रद्द करण्याच्या आदेशाला ग्रहण लागले आहे.
घाटधारकाने हा घाट अक्षय बुरांडे व त्याच्या सहकाऱ्यांना उपसा करण्यासाठी दिला होता. ते गावातून जड वाहतूक करीत असल्याने १६ जुलै रोजी गावकऱ्यांनी त्यांना गावातून वाहतूक करण्यासाठी मनाई केली. तेव्हा बुरांडे याने गावकऱ्यांशी वाद घालत चाकू हल्ला केला. यात ज्ञानेश्वर इंगळे गंभीर जखमी झाले. तक्रारीवरुन वडनेर पोलिसांनी आरोपीला अटकही केली. त्यानंतर हा वाळू घाट रद्द करण्याच्या कार्यवाहीला सुरुवात झाली. आता महिनाभरापेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही घाट रद्द करण्याचा आदेश पारीत झाला नसल्याने कुठे तरी पाणी मुरत असल्याचे दिसून येत आहे. या कालावधीत घाटधारकाला प्रशासनाकडून वाळू उपस्याची मूक संमती तर दिली जात नाही ना? असाही प्रश्न आता चर्चीला जात आहे.
तहसिलदार म्हणतात घाट रद्दची कारवाई झाली
धोची घाटावरील कारवाई संदर्भात हिंगणघाटचे तहसीलदार मुंधडा यांना विचारले असता त्यांनी घाटातून उपसा बंद आहे. तसेच घाट रद्दचा आदेशही पारीत झाल्याचे सांगितले. इतकेच नाही तर आदेशाची प्रतही असल्याचेही ते म्हणाले. परंतू प्रत मागितली असता काही वेळाने त्यांनी आदेशच झाला नाही, आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल पाठविला. आता ती फाईल अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे, असा शब्द फिरविला. यावरुन या कारवाईत नक्कीच गोडबंगाल असल्याचे लक्षात येते.

Web Title: Dhochi Ghat canceled file pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू